scorecardresearch

“…म्हणून मी सर्व कार्यकर्त्यांची माफी मागतो”; देवेंद्र फडणवीस यांचं भर पत्रकार परिषदेत वक्तव्य

देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची भावी मुख्यमंत्री म्हणून घोषणा करताना सर्व कार्यकर्त्यांची माफी मागितली आहे.

Devendra Fadnavis Eknath Shinde 2
देवेंद्र फडणवीस

भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आणि सत्तास्थापनेचा दावा केला. यानंतर फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे भावी मुख्यमंत्री असतील अशी घोषणा केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सर्व कार्यकर्त्यांची माफी मागितली. “भाजपाचे कार्यकर्ते असो की एकनाथ शिंदे याचे शिवसैनिक असो कुणालाही शपथविधी सोहळ्याला प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे मी सर्वांची माफी मागतो,” असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी आमच्या तमाम कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे. पाऊस खूप आहे, मांडव टाकलेला नाही. कुणालाही निमंत्रण जाऊ शकत नाही. छोटा शपथविधी सोहळ होत आहे. म्हणून मी सर्व कार्यकर्त्यांची माफी मागतो. भाजपाचे कार्यकर्ते असतील, एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे कार्यकर्ते असतील कुणालाही या ठिकाणी प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे कुणीही येथे येण्याचा प्रयत्न करू नये.”

मुख्यमंत्रीपदाची घोषणा करताना फडणवीस काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “२०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या ५६ जागांसह भाजपा-शिवसेना युतीने १६१ जागा जिंकल्या. अपक्ष मिळून १७० लोक निवडून आले होते. यावेळी ही अपेक्षा होती की भाजपा आणि शिवसेना युतीचं सरकार तयार होईल. तेव्हा मोदींनी सर्वांच्या उपस्थितीने भाजपाचा मुख्यमंत्री बनेल अशी घोषणाही केली होती. निकाल आल्यानंतर तेव्हाचे आमचे मित्र आणि शिवसेनेच्या नेत्यांनी वेगळा निर्णय घेतला.”

“बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांचा आजन्म विरोध केला, हिंदुत्वाचा विरोध केला, सावरकरांचा विरोध केला अशा काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती करुन भाजपाला बाहेर ठेवला. हा जनमताचा अपमान होता. जनतेनं मतं महाविकास आघाडीला दिलं नव्हतं. ते युतीला दिलं होतं. जनमताचा अपमान करुन महाविकास आघाडी जन्माला आली. चालू कामांना स्थगिती, नवी विकास योजना नाही, प्रचंड भ्रष्टाचार आपल्याला पहायला मिळाला,” असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

“पुढील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे”

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “आज एकनाथ शिंदे यांच्या नेृत्वाखाली शिवसेनेचा विधीमंडळ गट, आम्ही भाजप आणि १६ अपक्ष-छोटे आमदार सोबत आलो आहोत. आणखी काही सोबत येत आहे. भाजपाने एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील. आज साडेसात वाजता एकनाथ शिंदे यांचा एकट्याचाच शपधविधी होईल.”

“लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करु”

“लवकरच आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करु. या विस्तारात शिंदे यांच्यासोबत असलेले, अपक्ष आणि भाजपाचे सर्व लोक मंत्रिमंडळात येतील. मी स्वत: बाहेर असेन. पण हे सरकार पूर्ण, व्यवस्थित चालले पाहिजे ही जाबाबदारी माझीदेखील असेल. त्यासाठी पूर्ण साथ आणि समर्थन मी या सरकारला देणार आहे,” अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Devendra fadnavis apologies to all bjp eknath shinde supporter in mumbai pbs