मुंबई : लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या टप्पा -२ च्या भूमिपूजनामुळे मुंबईसह राज्यातील नागरिकांना आधुनिक आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहेत.

परिणामी, रुग्णालयातील खाट संख्या १९०० वरून थेट ३,२८६ होणार आहे. रुग्णालयात मुख्य इमारत, कर्करोग, आपत्कालीन सेवा व बाह्यरुग्ण विभाग उभारले जाणार आहेत. यासाठी २५०० कोटी खर्च होणार असून २०३० पर्यंत बांधकाम पूर्ण होणार आहे. राज्य शासन व मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईतील प्रत्येक नागरिकाला मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा देण्याचा संकल्प असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

महानगरपालिकेच्या शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय पुनर्विकास टप्पा – २ रुग्णालय इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या रुग्णालयाची सुरुवात १९४७ मध्ये केवळ ६० खाटांपासून झाली होती. आज हे रुग्णालय सुमारे १९०० खाटांपर्यंत पोहोचले असून, विस्तारानंतर ही क्षमता ३,२८६ खाटांपर्यंत वाढणार आहे.

आशियातील मोठ्या ट्रॉमा केअर सेंटरपैकी एक, तसेच ह्युमन मिल्क बँक आणि भाजलेल्या रूग्णांकरिता स्किन बँकसारख्या सुविधा असलेले हे रुग्णालय आधीच विशेष मानले जाते. सध्याच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालय व्यवस्थेवर ताण असल्याने रुग्णालयाचे आधुनिकीकरण आणि विस्तार अत्यावश्यक होता, असे फडणवीस म्हणाले.

या प्रकल्पासाठी सुमारे २,५०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार असून, यात २५ मजली निवासी टॉवर (डॉक्टर व नर्सेससाठी), १३ मजली कॅन्सर केअर सुविधा, १५ मजली मुख्य रुग्णालय इमारत, १४ मजली आपत्कालीन विभाग, १३ मजली बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) आणि ४० हून अधिक ऑपरेशन थिएटर्सचा समावेश असेल, अशी माहिती त्यांनी दिली.

एमआरआय, सीटी स्कॅनसह अत्याधुनिक निदान सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. भविष्यात आरोग्य सेवेमध्ये तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल आणि या रुग्णालयात आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महात्मा फुले जन आरोग्य योजनांच्या माध्यमातून नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जात आहेत. सुमारे २,४०० आजारांवर मोफत उपचार उपलब्ध असून ४,५०० रुग्णालये या योजनांमध्ये सहभागी आहेत. काही गंभीर ९ आजारांसाठी २२ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते.

प्रधानमंत्री जनकल्याण योजना, महात्मा फुले जनआरोग्य योजना व मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्य सेवा देत आहोत. या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार कॅप्टन तमिल आर. सेल्वन यांनी लोकप्रतिनिधी म्हणून केलेला पाठपुरावा अत्यंत महत्त्वाचा आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केले.

हा प्रकल्प केवळ इमारतीचा विस्तार नसून आरोग्य व्यवस्थेच्या नव्या युगाची सुरुवात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री सहायता निधीमुळे लाखो रुग्णांना उपचार मिळाले असून, ही सुविधा आता नागरिकांच्या हक्काची बनली आहे. मुंबई महानगरपालिका देशातील एकमेव अशी संस्था आहे जी प्राथमिक, दुय्यम आणि तृतीय अशा तिन्ही स्तरांवर आरोग्य सेवा पुरवते. दरवर्षी सुमारे ७५ लाख बाह्यरुग्ण आणि २५ लाखांहून अधिक रुग्णांना उपचार दिले जातात. वन सिटी, वन हेल्थ सिस्टीम उभारत असून यामुळे मुंबईतील कोणत्याही महानगरपालिका रुग्णालयात रुग्णांना सुलभ आणि समन्वित सेवा मिळेल, असे महापौर रितू तावडे म्हणाल्या.

त्यावेळी आमदार कॅप्टन तमिल आर. सेल्वन, आमदार कालिदास कोळबकर, आमदार प्रसाद लाड, आमदार सुनील शिंदे, उपमहपौर संजय घाडी, माजी महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा उपस्थित होते.

पुनर्विकास – टप्पा २ अंतर्गत होणारी कामे

  • मुख्य इमारतीसह कर्करोग उपचार सेवा, आपत्कालीन सेवा व बाह्यरुग्ण विभाग, ३,२८६ खाटांची क्षमता.
  • १५ मजली मुख्य इमारत २,२०० खाटांची क्षमता.
  • २४ तास आपत्कालीन सेवा व २४ ऑपरेशन थिएटर.
  • रेडिओलॉजी सुविधा एक्स-रे, सिटीस्कॅन एम. आर. आय..
  • सोनोग्राफी न्यूमॅटिक शूट प्रणाली.
  • रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना.
  • प्रधानमंत्री जीवनदायी आरोग्य योजना यांचे कार्यालय.
  • अत्याधुनिक प्रयोगशाळा, फार्मसी, कॅथलॅब, रुग्ण आहारगृह, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी उपाहारगृह, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी सुसज्ज प्रतीक्षा कक्ष.

कर्करुग्णांसाठी अल्पदरात व मोफत उपचार

  • कर्करोग रूग्णांसाठी १३ मजली स्वतंत्र इमारत; २०० खाटा उपलब्ध, केमोथेरपी, रेडिओथेरपी, पेट स्कॅन, एमआरआय, सिटीस्कॅन
  • १४ मजली आपत्कालीन सेवा इमारत१४ मजली इमारत; ६०० खाटा उपलब्ध, ट्रॉमा मास कॅज्युलिटी, ६ ऑपरेशन थिएटर, ॲडव्हान्स लाइफ सपोर्ट सुविधा, तास सुविधा उपलब्ध, सहा ऑपरेशन थिएटर
  • बाह्यरुग्ण विभागासाठी १४ मजली स्वतंत्र इमारत, सुमारे १६,००० रुग्णांची क्षमता, रक्तपेढी