मुंबई : इतकी वर्षे आम्ही मुंबई चालवली व आता तुम्ही बाहेरून येऊन काय मुंबई चालवणार? ही मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबई महापालिकेच्या वतीने आयोजित ‘पार्टिसिपेट मुंबई’ या प्रकल्पाच्या लोकार्पण कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. भाजपची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री प्रथमच मुंबई महापालिकेत आले होते.
‘पार्टिसिपेट मुंबई’ प्रकल्पाच्या लोकार्पणासोबतच मुंबई महानगरपालिका-समग्र संस्था यांच्यात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करार करण्यात आला. त्यावेळी भाषणात फडणवीस पुढे म्हणाले की, नव्या गोष्टी शिकणे व काळानुसार बदलणे थांबवले, तर एक दिवस आपण कालबाह्य होतो. वेळ व काळ कोणासाठीही थांबत नसतो. काळ व वेळेसोबत बदलणे, हे महत्त्वाचे असते.
प्रशासनातील अशा वृत्तीबाबत बोलताना मुख्यमंत्री बोलत होते. मुंबई महापालिकेत गेली २५ वर्षे शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाची सत्ता होती. पालिका निवडणुकीत ही सत्ता उलथून भाजपची सत्ता आली आहे. त्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री महापालिकेत आले होते. मुख्यमंत्र्यांच्या बोलण्याचा रोख उद्धव ठाकरे यांच्यावर असल्याची पालिकेत चर्चा होती.
फडणवीस पुढे म्हणाले की, ताठर भूमिका सर्वांमध्येच असते. अनेक वर्षे आम्ही ही प्रक्रिया करीत आहोत, आता बाहेरून येऊन आम्हाला कोण शिकवणार, आम्ही इतकी वर्षे मुंबई चालवली व आता तुम्ही बाहेरून येऊन काय मुंबई चालवणार, अशी मानसिकता असते. ही चुकीची मानसिकता नसून एक प्रकारची आत्मसंतुष्ट वृत्ती आहे. मात्र, ती मोडण्याची आवश्यकता आहे, असे फडणवीस म्हणाले.
प्रशासनाच्या ३०-४० वर्षांपूर्वी तयार झालेल्या कार्यपद्धती आजच्या काळात तितक्याच उपयुक्त राहिलेल्या नसतात. त्यामुळे प्रशासनातील जुन्या कार्यपद्धतींचे पुनरावलोकन करून त्या अधिक सुलभ व गतिमान करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.
नागरिकांना आज तात्काळ सेवा व समस्यांवर त्वरित प्रतिसाद अपेक्षित आहे. समाजमाध्यमांवर नागरिकांनी समस्या मांडल्यानंतर त्यावर तत्काळ कार्यवाही व प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे केवळ वरवरच्या सुधारणा न करता संपूर्ण वितरण प्रणालीतील त्रुटी शोधून त्या दूर करणे गरजेचे असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र शासनाच्या ११०० ऑनलाइन सेवांचा आढावा घेतल्यानंतर सुमारे २०० सेवा अशा आढळल्या की, त्या क्वचितच कोणी मागत होते. तर एकूण सेवांपैकी केवळ ४५ ते ४७ सेवा व योजनांसाठी सुमारे ९० टक्के नागरिक शासनाकडे येतात. त्यामुळे या महत्त्वाच्या सेवांचे नव्याने अभिसरण करून त्या अधिक प्रभावीपणे देण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
शून्य मानवी हस्तक्षेप
मुंबई महापालिकेच्या इमारत प्रस्तावांसाठी सुरू करण्यात आलेल्या एआय आधारित व्यवस्थेचा उल्लेख करताना, भविष्यात शून्य मानवी हस्तक्षेप प्रणाली कार्यान्वित करून इमारत प्रस्ताव मंजूर होण्याचा दिवस पाहायचा आहे, अशी अपेक्षाही फडणवीस यांनी व्यक्त केली.
