मुंबई: राज्यात स्मार्ट मिटरमुळे नव्हे तर हवामानातील बदल, उष्णतेची लाट आणि लांबलेला पाऊस यामुळे वीज बिलात वाढ झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
राज्यात अनेक ठिकाणी भारनियमन होत असून स्मार्ट मिटरमुळे भरमसाठ विजबिले येत असल्याचा आरोप विधानसभेत सदस्यांनी केला होता. त्यावर राज्यात कुठेही भारनिमन नाही. पण ग्रामीण भागात काही ठिकाणी वीज मिळत नाही. जे ग्राहक कृषी फिडरवर आहेत. त्यांना रात्री वीज मिळत नाही. कारण ज्या ७६ टक्के कृषी फिडरला दिवसा वीज दिली जाते त्यांची रात्री वीज बंद केली जाते. त्यामुळे त्यांना भारनियमन वाटते असे फडणवीस यांनी सांगितले.
स्मार्ट मिटरबाबत बोलताना राज्यात एक कोटी २३ लाख स्मार्ट मिटर लावण्यात आली आहेत. त्यापैकी ३ लाख ९२ हजार ग्राहकांकडून तक्रारी आल्या. त्यापैकी केवळ २१० तक्रारींमध्ये तथ्य आढळले आहे. स्मार्ट मिटर वापरणाऱ्यांना दिवसा विजबिलात सवलत दिली जाते. तरीही लोकांच्या वीज बिल जास्त आल्याच्या तक्रारी येत आहेत, भरमसाठ बिले येण्यास स्मार्ट मिटर नव्हे तर हवामानातील बदल आणि उष्णतेची लाट कारणीभूत असल्याचा दावा केला.
राज्यात गेल्या वर्षी मे् महिन्यात विजेची मागणी २८ हजार मेगावॅट होती. यंदा हीच मागणी ५ हजारने वाढून ३३ हजार मेगावॅटवर पोहोचली. ऊर्जा विभागाने बदलापूर शहरात केलेल्या अभ्यासानुसार हवामानातील बदलामुळे बदलापूरात मे २५ मध्ये ३८ अंश सेल्शीअस तापमान होते ते यंदा मे २६ मध्ये ४३ अंश सेल्सीअसवर पोहोचले. म्हणजे ५ अंशांनी वाढले.त्यातच पाऊसही एक महिना उशिरा पडला. तसेच ३०० युनिट पर्यंत स्वस्तात विज दिली जाते. तर त्याच्यावर वीज वापर गेल्यास प्रति युनिट पाच रुपयांची तर ५०० युनिटच्या वर वीज वापर गेल्यास अजून दोन रुपयांची वाढ होते. या पद्धतीमुळे वीजेच्या वापरानुसार दरवाढ होत असली तरी मुळातच तापमान वाढ आणि पाऊस लांबल्यामुळे यंदा बीजबिलात वाढ झाल्याचा दावा फडणवीस यांनी केला.
महाराष्ट्राचा हा अपमानच
मिसिंग लिंकला काहीही झालेले नसताना ७ हजार कोटी पाण्यात गेल्याच्या खोट्या बातम्या पेरणे, अफवा बसरविणे हा आपला नव्हे तर महाराष्ट्राचाच अपमान असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मिसिंग लिंक बाबतच्या आपल्या वक्तव्याने अनेकांना मिरच्या झोंबल्याचा टोलाही त्यांनी ना लगावला.
अतिवृष्टीमुळे मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याच्या घटनेवरुन विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठविली होती. त्यामुळे नाराज झालेल्या मुख्यमंत्र्यांनी मिसिंग लिंकवरुन विरोधक महाराष्ट्राचा अपमान करीत असल्याचा आरोप करीत बघून घेण्याचा इशारा दिला होता. त्यावरुन मनसेचे राज ठाकरे यांनी फडणवीस यांना खडे बोल सुनावले होते. आज याबाबत बोलताना राज ठाकरे मिमिक्री छान करतात. ते स्टँडअप काॅमेडिनयन झाले असते तर एकाही काॅमेडियनला मार्केट राहिले नसते. आपण एकाला बोललो पण मिरच्या दुसऱ्यालाच झोंबल्या असे सांगून फडणवीस यांनी राज ठाकरेंचा राजकारणात आम्हाला कसलाही धोका नसल्याचा टोला लगावला.
