देशातील इंधन दराचा भडका आणि महागाईचा चढता आलेख या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनंतर आता राज्य सरकारने देखील पेट्रोल डिझेलवरील मूल्यवर्धित करात कपात केली. यामुळे सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. या निर्णयानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. यात फडणवीसांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केली. हा निर्णय म्हणजे सामान्य माणसाची क्रूर थट्टा असल्याचा आरोप करत त्यांनी किमान १० टक्के भार घेण्याची मागणी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “इंधन दर कपात करताना केंद्र सरकारने २,२०,००० कोटी रुपयांचा आर्थिक भार घेतला आहे. असं असताना किमान महाराष्ट्राच्या आर्थिक लौकिकाला साजेशी घोषणा अपेक्षित होती. देशाच्या जीडीपीमध्ये आपला वाटा १५ टक्के आहे. इंधन दर कपातीत राज्य सरकारने किमान १० टक्के तरी भार घ्यायचा होता. पण नाही! याला म्हणतात ‘उंटाच्या तोंडात जिरे’!

“अन्य राज्य सरकारे ७ ते १० रुपये दिलासा देत असताना महाराष्ट्रासारख्या राज्याने १.५ आणि २ रुपये दर कमी करणे, ही सामान्य माणसाची क्रूर थट्टा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत असताना मनाचा थोडा मोठेपणा दाखविला असता तर बरे झाले असते,” असंही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं.

राज्य सरकारकडून पेट्रोल डिझेलवरील मूल्यवर्धित करात कपात

केंद्र शासनाने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलचे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने २२ मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) अनुक्रमे २ रुपये ८ पैसे आणि १ रुपया ४४ पैसे प्रती लिटर कपात केली आहे आहे. यामुळे वर्षाला सुमारे २५०० कोटी रुपयांचा भार राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने कमी केलेल्या करामुळे पेट्रोल ११ रुपये ५८ पैशांनी स्वस्त झाले आहे. तर डिझेलच्या दरात ८ रुपये ४४ पैशांनी स्वस्त झाले आहे.

मूल्यवर्धित कर कमी केल्याने पेट्रोलकरिता ८० कोटी रुपये महिन्याला आणि १२५ कोटी रुपये डिझेलकरिता इतके महसुली उत्पन्न कमी होणार आहे. १६ जून २०२२ ते ४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे ७ रुपये ६९ पैसे आणि १५ रुपये १४ पैसे प्रती लिटर कर आकारात होते. मार्च आणि मे २०२० मध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी दरात अनुक्रमे १३ आणि १६ रुपये अशी वाढ केली होती.

हेही वाचा : “सत्तेतील पक्षांनी रस्त्यावर बसायचे नसते, तर…”; केंद्राच्या इंधन दर कपातीनंतर फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोला

आता नवीन दर काय असतील?

व्हॅट कमी करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर मुंबईत पेट्रोल १०९ रुपये २७ पैसे प्रतिलिटर दराने उपलब्ध होणार आहे. पेट्रोल प्रतिलिटर २ रुपये ८ पैसे कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याशिवाय सरकारने डिझेलवर १ रुपये ४४ पैसे कमी करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे डिझेल प्रति लिटर ९५ रुपये ८४ पैसे मिळणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis comment on mva government decision of fuel tax deduction pbs
First published on: 22-05-2022 at 20:48 IST