देवेंद्र फडणवीसांनी थेट तालिबानी विचारांशी केली स्मृतीस्थळ शुद्धीकरणाची तुलना! म्हणाले…

बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ शुद्धीकरणाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर परखड शब्दांत टीका केली आहे.

devendra fadnavis targets shivsena
देवेंद्र फडणवीसांची शिवसेनेवर टीका

नारायण राणे यांनी गुरुवारी मुंबईत बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला भेट दिली. यानंतर काही स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांनी या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केल्याचं समोर आलं. यावरून भाजपाकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. खुद्द राणेंनी देखील या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंवर टीका केलेली असताना आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. असं करताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना कार्यकर्त्यांच्या या विचारांची तुलना थेट तालिबानी विचारसरणीशी केली आहे. त्यामुळे यावरून आता भाजपा आणि शिवसेना यांच्यामध्ये चांगलीच जुंपण्याची शक्यता आहे.

..त्यांना बाळासाहेबांची शिवसेना समजलीच नाही!

शुद्धीकरणाच्या प्रकारावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर परखड शब्दांमध्ये निशाणा साधला. “ज्या लोकांनी हे केलं असेल, त्यांना बाळासाहेबांची शिवसेना समजलीच नाही. ही अतिशय संकुचित मानसिकता आहे, एक प्रकारे बुरसटलेला तालिबानी विचार आहे. अशा प्रकारे वागणं हे योग्य नाही. महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

ज्यांनी बाळासाहेबांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला..

“ज्यांनी बाळासाहेबांना जेलमध्ये घालण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता आणि बाळासाहेबांवर श्रद्धा ठेऊन त्यांच्या समाधीवर कुणी जात असेल, तर ती समाधी अपवित्र झाली असं सांगता. ही कृती अतिशय अयोग्य आहे”, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“केंद्राच्या नावाने कावीळ झालेले हे लोक!”

दरम्यान, बैलगाडा शर्यतीरवरून केंद्र सरकारवर टीका करणाऱ्या खासदार अमोल कोल्हे यांच्यावर देखील देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडलं. “केंद्राच्या नावाने कावीळ झालेले हे लोक आहेत. यांचा केंद्राशी काहीही संबंध नाही. ज्यावेळी यासंदर्भात न्यायालयाने निर्णय दिला आम्ही महाराष्ट्र सरकारमध्ये होतो. आम्ही कायदा तयार केला. त्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यावेळी आम्ही रनिंग अॅबिलिटी ऑफ बुल असा रिपोर्ट तयार करून सादर केलाय. त्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे. पाळीव प्राण्यांच्या यादीतून बैलांना काढण्यात आलं ते काँग्रेस सरकारच्या काळात काढण्यात आलं आहे. प्राण्यांबद्दल दाखवली जाणारी क्रूरता यावर स्थगिती दिली आहे. या सगळ्यांना फक्त केंद्राकडे बोटं दाखवायची आहेत आणि नाटकं करायची आहेत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

मुंबईतील बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन केलं होतं. मात्र, नारायण राणे या ठिकाणाहून निघून गेल्यानंतर तिथे शिवसेना कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचं दुधानं शुद्धीकरण करण्यात आलं. बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचे केअर टेकर आप्पा पाटील यांनी स्मृतीस्थळावर आधी दुग्धाभिषेक, त्यानंतर गोमूत्राने हे शुद्धीकरण करण्यात आलेलं आहे. त्यानंतर तिथे फुलं वाहण्यात आली.

“हे उद्धव ठाकरेंच्या कारकिर्दीचं सगळ्यात उत्तम काम”, स्मृतीस्थळ शुद्धीकरणावरुन नारायण राणेंचा संताप!

“राणेंना इतक्या वर्षांत बाळासाहेब दिसले नाहीत”

हे शुद्धीकरण करणारे आप्पा पाटील यांनी यावेळी नारायण राणे यांच्यावर देखील टीका केली आहे. “आज ही वास्तू अपवित्र झाली. तिथे दुग्धाभिषेक करून शुद्धीकरण केलं. बाळासाहेबांची फ्रेम पाण्याने धुवून तिच्यावर दुग्धाभिषेक केला. त्यानंतर बाळासाहेबांना आवडणारी चाफ्याची फुलं तिथे वाहिली. त्यांना आज शिवसेना दिसली. इतक्या वर्षात शिवसेना सोडून गेल्यानंतर त्यांना बाळासाहेब दिसले नव्हते. देशाच्या टॉप ५ मध्ये असणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ते काहीही बोलत होते. आम्ही ठाकरे कुटुंबाबद्दल निष्ठा राखणारे शिवसैनिक आहोत. त्यामुळे आम्ही हे सहन करू शकत नाही. म्हणून आम्ही हे शुद्धीकरण केलं आहे. मी रोज इथे येतो”, अशी प्रतिक्रिया हे शुद्धीकरण करणारे शिवसेना कार्यकर्ते आप्पा पाटील यांनी दिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Devendra fadnavis compare balasaheb thackeray smritisthal shuddhikaran with taliban targets shivsena pmw

ताज्या बातम्या