"केजरीवालांनी टीव्ही शोमध्ये गुजरात निवडणुकीविषयी लिहून दिलं होतं की...", फडणवीसांचा आपवर हल्लाबोल | Devendra Fadnavis criticize Delhi CM Arvind Kejriwal over Gujrat Election claim | Loksatta

“केजरीवालांनी टीव्ही शोमध्ये गुजरात निवडणुकीविषयी लिहून दिलं होतं की…”, फडणवीसांचा ‘आप’वर हल्लाबोल

भाजपाला गुजरात विधानसभा निवडणुकीत १५६ जागांवर ऐतिहासिक विजय मिळाला. यानंतर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करणाऱ्या आम आदमी पक्षावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केलीय.

“केजरीवालांनी टीव्ही शोमध्ये गुजरात निवडणुकीविषयी लिहून दिलं होतं की…”, फडणवीसांचा ‘आप’वर हल्लाबोल
देवेंद्र फडणवीस व अरविंद केजरीवाल (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

गुजरात विधानसभा निवडणूक भाजपा, काँग्रेस आणि आप अशी तिरंगा झाली. मात्र, निकालात ही निवडणूक एकतर्फी झाल्याचं पाहायला मिळालं. संपूर्ण ताकद लावून झोकून देणाऱ्या आपला एक अंकी आमदारांसह केवळ खातं खोलता आलं आहे. काँग्रेसच्या जागांमध्येही मोठी घट झालीय आणि भाजपाला १५६ जागांवर ऐतिहासिक विजय मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करणाऱ्या आम आदमी पक्षावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केलीय. तसेच टीव्ही शोमध्ये गुजरात निवडणुकीत किती जागा येणार हे लिहून देणाऱ्या केजरीवालांवर निशाणा साधला. ते गुरुवारी (८ डिसेंबर) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “ज्यांनी आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवारही घोषित केला होता असा आप नावाचा पक्ष तोंडावर आपटला आहे. आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी एका टीव्ही शोमध्ये गुजरात निवडणुकीत त्यांना किती जागा मिळणार हे लिहून दिलं होतं.”

“निकालाने केवळ केजरीवाल दिल्लीचे नेते आहेत हे दाखवलं”

“त्या किती जागा होत्या त्या त्यांना आणि त्या टीव्ही चॅनलला माहिती आहे. परंतु, आजच्या निकालाने अरविंद केजरीवाल दिल्लीचे नेते आहेत आणि दिल्लीच्या बाहेर ते नेते नाहीत आणि त्यांचा पक्षही नाही हे दाखवून दिलं आहे,” असं म्हणत देवेंद्र फडणीसांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केलं.

“भाजपाने मोदींच्या नेतृत्वात गुजरातमध्ये इतिहास निर्माण केला”

निकालावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गुजरातमध्ये एक इतिहास निर्माण केला आहे. आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडून भाजपाने १५७ च्या जवळपास जागा जिंकल्या आहेत. हा ऐतिहासिक आणि अपेक्षित निकाल आहे. २७ वर्षांच्या सत्तेनंतर भाजपा पुन्हा निवडणुकीला सामोरे गेली. विरोधी पक्षांना वाटलं २७ वर्षे सत्तेत राहिल्याने सरकारविरोधी जनमत असेल. मात्र, या निवडणुकीत सरकारच्या बाजूने जनमत असल्याचं मी म्हटलं होतं. ते निकालातून दिसलं.”

हेही वाचा : VIDEO: “शेळीने उंटाचा मुका…”, ‘सभा उधळून लावू’ म्हणणाऱ्या मनसे नेत्याला सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर

“गुजरातमध्ये काँग्रेसचा आतापर्यंतचा निचांक”

“लोकांनी मोदींवर आणि भाजपावर पूर्ण विश्वास टाकला आहे. काँग्रेसचा दारुण पराभव झालाय. गुजरातमध्ये काँग्रेसला केवळ १६ ते १७ जागा मिळताना दिसत आहे. हा त्यांचा आतापर्यंतचा निचांक आहे,” असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 18:10 IST
Next Story
मुंबई: स्वस्तात सदनिका देण्याचे आमिष दाखवून साडेचार कोटीची फसवणूक; कंपनीच्या तीन संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल