scorecardresearch

“मेट्रो आता पुढची पाच वर्षे होऊ शकत नाही”; कारशेडच्या जागेवरुन देवेंद्र फडणवीसांची सरकारवर टीका

बुलेट ट्रेनला अर्थव्यवस्थेमुळे काय चालना मिळणार आहे हे रोज ओरडून सांगायचो, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले

Devendra Fadnavis criticizes the government from the place of Metro car shed

मुंबई मेट्रेच्या कारशेडसाठी  जागेचा वाद अजूनही संपलेला नाही. याआधी फडणवीस सरकारच्या काळाच आरेच्या जंगलात कारशेडचा तयार करण्यात येत होते. त्यासाठी काही झाडंही तोडण्यात आली. मात्र शिवसेना आणि पर्यावरण प्रेमींना आरेमध्ये  मेट्रोच्या कारशेडला कडाडून विरोध केला. काही दिवसातच राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर ठाकरे सरकारने आरेतल्या कारशेडला स्थगिती दिली. त्यानंतर कारशेड कांजूर मार्गला करत असल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आलं. मात्र ही जागा केंद्र आणि राज्य सरकारच्या वादात सापडली. केंदाने या जागेवर दावा केल्याने राज्य सरकारच्या अडचणी वाढल्या. त्यानंतर पुन्हा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी लवकरच मेट्रोच्या कारशेडचे नवे ठिकाण जाहीर करू असे म्हटले होते.

त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारच्या धोरणावर टीका केली आहे. मेट्रो संदर्भात जे काही धोरण आहेत ते बदलावे अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. तसेच बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाबाबत असलेल्या सरकारच्या भूमिकेवरही फडणवीसांनी निशाणा साधला.

“चार वर्षे बुलेट ट्रेन फुकटात होत असल्याचे मी सांगत होतो. पण आता तुम्हीच मुंबई ते हैद्राबाद बुलेट ट्रेनसाठी मागणी करत असल्याचा मला आनंद आहे. बुलेट ट्रेनला अर्थव्यवस्थेमुळे काय चालना मिळणार आहे हे रोज ओरडून सांगायचो. तुम्ही मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गासाठी मदत केली नाही. पण मुंबई ते हैद्राबाद बुलेट ट्रेनसाठी प्रयत्न करत आहात,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“मेट्रो ३च्या कारशेडला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली होती. या वर्षाच्या शेवटपर्यंत कार्यान्वीत होणारी मेट्रो आता पुढची पाच वर्षे होऊ शकत नाही. त्यामुळे मेट्रो संदर्भात जे काही धोरण आहेत ते बदलावे अशी माझी विनंती आहे. तात्काळ ज्या ठिकाणी कारशेडचे २५ टक्के काम पूर्ण झाले आहे तिथे कारशेड करण्यात यावे. हे काम नऊ महिन्यात पूर्ण होऊ शकते. पाच वर्ष कशाला थांबायचे? आडमुठेपणा सोडून कारशेड त्या ठिकाणी केले पाहिजे,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Devendra fadnavis criticizes the government from the place of metro car shed abn