मुंबई : दहीहंडीचा उत्सव हा केवळ मनोरंजनाचा सोहळा न राहता त्यातून युवकांना व्यसनमुक्तीचा संदेश देण्याची गरज आहे. दहीहंडीच्या उत्साहाला सामाजिक उपक्रमांची जोड देऊन ‘नशामुक्त महाराष्ट्र’ संकल्पनेला बळकटी द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी आणि सक्षम समाजनिर्मितीसाठी योगदान द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी वरळी, दादर आणि घाटकोपर येथील विविध दहीहंडी उत्सवांना भेट देऊन गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या. वरळी येथील राजयोग प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात बोलताना त्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश कुटुंब आणि समाजापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. निरोगी आणि सक्षम महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्रत्येक नागरिकाने व्यसनमुक्तीचा संकल्प करावा, असे त्यांनी सांगितले.

घाटकोपर येथील श्रेयस सिनेमा चौकात आमदार राम कदम यांच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवात त्यांनी गोविंदा पथकांच्या उत्साहाचे कौतुक केले. मानवी मनोरे हे संघटित प्रयत्नांचे उत्तम उदाहरण आहे. मनोऱ्याच्या प्रत्येक थरातील गोविंदाची भूमिका महत्त्वाची असते. तळातील गोविंदांचा मजबूत आधार, वरच्या थरातील गोविंदांमधील समन्वय आणि सर्वांत वरच्या थरावर पोहोचणाऱ्या बालगोविंदाचे धैर्य यामुळे दहीहंडी यशस्वी होते, असे मार्गदर्शन फडणवीस यांनी गोविंदा पथकांना केले. घाटकोपरची दहीहंडी मुंबईतील प्रमुख आकर्षणांपैकी एक बनली असून, देशाच्या विविध भागांतून गोविंदा पथके या उत्सवात सहभागी होतात. त्यामुळे या उत्सवाला व्यापक सांस्कृतिक स्वरूप प्राप्त झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.

वरळीतील राजयोग प्रतिष्ठानच्या उत्सवात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रतिकात्मक दहीहंडी फोडून उत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. दहीहंडीमधून ‘नशामुक्त महाराष्ट्र’ मोहिमेचा संदेश देणारे फलक प्रदर्शित करण्यात आले. त्यानंतर जांबोरी मैदानावरील परिवर्तन फौंडेशनच्या दहीहंडी उत्सवातही त्यांनी सहभाग घेतला. दहीहंडीमधून युवकांना संघभावना, नेतृत्व, परिश्रम आणि ध्येयपूर्तीची प्रेरणा मिळते. उंच मानवी मनोरे रचताना गोविंदांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, महापौर रितू तावडे तसेच आमदार कालिदास कोळंबकर, प्रवीण दरेकर, राम कदम, अमित साटम, अनेक गोविंदा पथके उपस्थित होते.