पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या शुक्रवारच्या बारामती भेटीने भाजप नेत्यांच्या बारामती भेटीचे वर्तुळ पूर्ण झाले आहे. भाजपच्या वाढत्या जवळिकीमुळेच राष्ट्रवादीबद्दल राज्यात संशय आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण होत असून याचा पक्षाला भविष्यात फटका बसू शकतो, असा सूर पक्षाच्या नेत्यांमध्ये आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीबाबत भाजपच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य सरकारकडून छगन भुजबळ, अजित पवार आणि सुनील तटकरे या राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेत्यांची चौकशी सुरू करण्यात आली असता भाजपचेच नेते बारामतीमध्ये जाऊन शरद पवार यांचे कौतुक करीत असल्याने सरकारच्या कारवाईबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होते. प्रचारात भ्रष्टाचारावरून राष्ट्रवादीला भाजपने लक्ष्य केले होते. त्याच राष्ट्रवादीच्या नेतृत्वाशी भाजपचे नेते मांडीला मांडी लावून बसू लागल्याने भाजपबद्दलही संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने कायमच दिल्लीच्या तख्ताशी जुळवून घेतले आहे. यामुळे राष्ट्रवादीवर टीका झाली तरी पक्षाच्या प्रतिमेवर तेवढा परिणाम होत नाही. भाजपसाठी मात्र डोकेदुखी वाढू शकते.
भाजपच्या वाढत्या बारामती प्रेमाने भुजबळ, अजितदादा, तटकरे यांच्या चौकशीचे भवितव्य काय, असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. उद्या शिवसेनेला घरचा रस्ता दाखवायचा झाल्यास भाजपला राष्ट्रवादीची गरज भासू शकते. भाजपच्या वाढत्या जवळिकीबद्दल राष्ट्रवादीमध्ये मात्र अस्वस्थता आहे. भाजप सरकारच्या विरोधात कशी आक्रमक भूमिका घ्यायची, अशी प्रतिक्रिया पक्षाच्या एका नेत्याने व्यक्त केली. अलीकडेच झालेल्या नगर पंचायतींच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या. यावरून भाजपविरोधातील नाराज मतदार काँग्रेसकडे झुकू शकतो, असेही या नेत्याचे म्हणणे आहे.

हा तर त्रिकोण – पृथ्वीराज चव्हाण
राज्यात भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांचे सरकार असले तरी अप्रत्यक्षपणे त्रिकोणी सरकार असल्याची मार्मिक प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री व अन्य भाजप नेत्यांच्या बारामती दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर व्यक्त केली. कोणी कोणाला बोलवावे आणि कोणी कोठे जावे हा वैयक्तिक प्रश्न असला तरी यातून काही तरी वेगळा संदेश जात आहे. राज्यातील जनता सुज्ञ आहे, असे मतही चव्हाण यांनी व्यक्त केले.

शेतीमध्ये गुंतवणूक वाढण्याची गरज-फडणवीस
पुणे: शेती व्यवसाय शाश्वत होण्यासाठी शेतीमधील गुंतवणूक वाढण्याची आवश्यकता असून त्यासाठी या क्षेत्रातील सर्व घटकांचे सहकार्य सरकार घेईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राज्यामध्ये १ हजार ५९ ठिकाणी स्वयंचलित वेधशाळा कार्यान्वित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. डाळ आणि तेलाच्या किमतीची चर्चा केवळ सणासुदीला नको, तर या उत्पादनामध्ये देश स्वयंपूर्ण होण्याची गरज असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. बारामती येथील अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टतर्फे आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रात्यक्षिकांवर आधारित कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले.

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis eknath shinde visit baramati
First published on: 07-11-2015 at 03:39 IST