मुंबई : मुंबईचा महापौर हिंदू व मराठीच होईल, अशी ग्वाही देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ सुरक्षित मुंबई ‘ चा नारा महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडताना शनिवारी दिला. मुंबईतील बांगलादेशींना हुडकून काढून त्यांना मायदेशी परत पाठविले जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. पश्चिम बंगाल मधून ममता बँनर्जी यांच्या आशिर्वादाने बांगलादेशींची देशात घुसखोरी होत असल्याचा व मुंबईला त्यांच्यापासून धोका असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

आमचे कुठल्याही धर्माशी वैर नाही. प्रत्येकाला धर्म व पूजापद्धती जपण्याचा अधिकार आहे. पण वंदेमातरमला व देशाला विरोध किंवा शत्रुत्व करणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला. मुंबईच्या पर्यावरण रक्षणासाठी सुमारे १७ हजार कोटी रुपयांचे खर्चून योजना तयार करण्यात येत असून हे प्रदूषणमुक्त शहर करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

ही निवडणूक मुंबईचे चित्र व मुंबईकरांचे जीवन बदलणारी असून महायुतीची महापालिकेत सत्ता आल्यावर गोरगरीब व मध्यमवर्गीयांच्या जीवनात परिवर्तन आणून नवीन मुंबई घडविली जाईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडताना मुंबईसाठी महायुतीने आखलेल्या संकल्प चित्राचीही रूपरेषा मांडली. महापालिकेच्या ७० हजार कोटी रुपयांच्या ठेवी ‘ करून दाखविल्या, ‘ या ठाकरे यांच्या घोषणेवर टीका करताना फडणवीस म्हणाले, या ठेवी चाटायच्या आहेत का?

मराठी माणूस, गिरणी कामगार मुंबईच्या बाहेर फेकला गेला. त्याच्यासाठी या निधीतील काही रक्कम खर्च केली नाही. मुंबईचे सांडपाणी समुद्रात सोडून समुद्र किनारे व मिठी नदी खराब केली. पण महायुती सरकारच्या पुढाकाराने सुमारे १६ हजार कोटी रुपये खर्च करून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची कामे सुरू केली. ती पूर्ण होतील, तेव्हा मुंबईचा समुद्रकिनारा व पाणी सुंदर व स्वच्छ होईल. मुंबईच्या पर्यावरण रक्षणासाठी महायुती सरकार विशेष योजना तयार करीत असून मुंबईच्या पर्यावरण रक्षणाचा अर्थसंकल्प सुमारे १७ हजार कोटी रुपयांचा असेल.

ठाकरे यांनी महापालिकेतील सत्ताकाळात भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार करून दाखविला आहे. आमच्या सरकारच्या कामगिरीचे जाहिरातफलक लावण्याची गरज नाही, त्याचे पुरावे सर्वत्र दिसून येत आहेत, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मुंबईकरांना विकासाचे मारेकरी नको, वारकरी हवेत

उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘ भ्रष्टाचारसम्राट ‘ व बकासुर असा करून त्याचा पराभव करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुंबईकरांना भावनिक राजकारण नको, विकासाचे मारेकरी नको, वारकरी हवे आहेत, असे सांगून शिंदे म्हणाले, मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होण्यास ठाकरे जबाबदार आहेत. त्यांना महापालिकेची तिजोरी हवी असून आतापर्यंतच्या सत्ताकाळात मलिदा खाल्ला, कंत्राटांमध्ये भ्रष्टाचार केला. त्यांना मराठी व मराठी माणसाची काळजी नाही, स्वत:च्या फायद्याची आहे. त्यांच्यासाठी मुंबई महापालिकेतील सत्ता ही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे, असे टीकास्त्र शिॆदे यांनी सोडले.

मुंबई खतरे में, असा त्यांनी नारा दिला आहे, पण त्यास मुंबईकर फसणार नसून ठाकरे यांचे राजकारण आता खतरें में, असल्याची टिप्पणी शिंदे यांनी केली. ठाकरे बंधू एकत्र आल्याने महायुतीच्या विजयावर परिणाम होणार नसून ते २० वर्षांपूर्वी का वेगळे झाले होते, त्यावेळी कोणाचा स्वार्थ होता, असे सवाल शिंदे यांनी केले.