scorecardresearch

“चाकू प्लांट करण्यापासून ते गळ्याला…”; गिरीश महाजनांवर मोक्का लावण्यासाठी सरकारने षडयंत्र रचल्याचा फडणवीसांचा आरोप

सरकारच षड्यंत्र करत असेल तर लोकशाहीला अर्थ उरत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

Devendra Fadnavis hands over pen drive with evidence of government conspiracy to Assembly Speaker

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी लक्षवेधी मांडताना राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपा आमदार गिरीश महाजनांवर मोक्का लावण्यासाठी सरकारी वकील, एसीपी यांच्यामार्फत सरकारने षडयंत्र रचल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांना केला आहे. सरकार पोलिसांचा गैरवापर करत असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी विधानसभा अध्यक्षांना सरकारच्या षडयंत्राचे पुरावे असणारा पेनड्राईव्हही सुपूर्द केला.

“देशामध्ये लोकशाही असून महाराष्ट्र पुरोगामी राज्य असल्याचे आपण म्हणतो. महाराष्ट्रातल्या राजकीय संस्कतीमध्ये आपण एकमेकांचे विरोधक आहोत पण शत्रू नाहीत. महाराष्ट्राची पोलीस व्यवस्था ही प्रगल्भ आहे. महाराष्ट्राच्या पोलिसांचा मला अभिमान आहे. पण अलिकडच्या काळात पोलीस दलाचा गैरवापर सकाकडून वाढला आहे. सरकारच षडयंत्र करत असेल तर लोकशाहीला अर्थ उरत नाही,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

“पेनड्राईव्ह मी अध्यक्षांना सुपूर्द करत आहे. सरकार कशा प्रकारचे कटकारस्थान शिजवत आहेत ते मी या पेनड्राईव्हमध्ये दिले आहे. गिरीश महाजनांच्या संदर्भात पुण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. २०१८मध्ये मराठा शिक्षण प्रसारक मंडळाच्या भोईटे गटाच्यावतीने गिरीष महाजनांचे स्वीय सहाय्यक रामेश्वर यांनी पाटील गटाच्या व्यक्तीचे अपहरण केले. त्यानंतर महाजनांचा फोन आला आणि त्यांनी धमकी दिली. अशा प्रकारची बनावट केस तयार करण्यात आली. त्या प्रकरणात गिरीष महाजनांना मोक्का लावण्यात यावा असे सांगून कागदपत्रे तयार करण्यात आली,” असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

“विरोधकांची कत्तल कशी करायची यासाठी षडयंत्र शिजत होते. या कथेमध्ये प्रमुख पात्र विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण हे होते. सुरेशदादा जैन, रमेश कदम, डीएसके, महेश मोतेवार, रवींद्र बराटे या प्रकरणात त्यांनी विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिले आहे. गिरीश महाजन यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला त्या प्रकरणातही सरकारी वकील हेच आहेत. या वकिलांचे कार्यालय आहे की, महाविकास आघाडी सरकारचा राजकीय कत्तलखाना अशी स्थिती आहे. चाकू प्लांट करण्यापासून ते गळ्याला रक्त लावण्यापासून ते ड्रग्जचा धंदा कसा दाखवायचा, रेड कशी टाकायची आणि कसेही करुन ही केस मोक्कामध्ये कशी फिट बसेल याचे नियोजन, गुन्हेगारी स्वरुपाचा कट एक सरकारी वकील करतो याची ही निर्लज्ज कथा आहे. या सरकारी कत्तलखान्याच्या नायकाची कथा आहे. यातील महानायकही मोठे आहेत. महाविकास आघाडीच्या कारागृहात गेलेल्या आणि कारागृहाबाहेर असलेल्या नेत्यांबाबतची त्याची मते, भविष्यातील सर्व योजना त्यांच्या कारनाम्याबाबत असलेली माहिती यावरही ते स्वतः प्रकाश टाकणार आहेत. या सव्वाशे तासाहून अधिक रेकॉर्डिंगमधील काही महत्वाचा भाग मी आपल्याला देतो,” असे देवेंद्र फडणवीसांना म्हटले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Devendra fadnavis hands over pen drive with evidence of government conspiracy to assembly speaker abn

ताज्या बातम्या