“आम्हाला स्वत:स हिंदू म्हणून घेण्यात अजिबात लाज वाटत नाही,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. “येथील संस्कृतीच्या वाहकांना मानलं पाहिजे, त्यांना नाकारता येणार नाही. आमच्या हिरोंबाबत ज्यांना वावडं नाही त्या सगळ्यांना आम्ही सामावून घेऊ,” असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. पाञ्चजन्य आयोजित ‘सुशासन संवाद : मुंबई संकल्प’ या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी हजेरी लावली होती. यावेळी दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी विविध विषयांवर भाष्य केले.

हिंदुत्ववाबद्दल मांडली भूमिका

“आमचा विचार हिंदुत्ववादी आहे, आमच्या नसांमध्ये हिंदुत्व आहे आणि आम्हाला स्वत:स हिंदू म्हणून घेण्यात अजिबात लाज वाटत नाही. हिंदुत्व आणि कट्टरता असं इतिहासात कधी झाले नाही. ज्यावेळी देशातील कट्टरतावादी लोकांनी त्यांच्याच देशातून लोकांना बाहेर काढले. अशावेळी या लोकांना आपल्याला कुठे आश्रय मिळेल अशी चिंता भेडसावत होती, तेव्हा भारताने त्यांना आश्रय दिला. हिंदू राजांनी त्यांना आश्रय दिला, त्यांना मोठं होण्याची संधी दिली,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

समोरुन वार केल्यास उत्तर दिले जाणार – फडणवीस

“पारसी लोकांना एकप्रकारे इराणमधून बाहेर काढण्यात आले आणि ते इथं आले. देशाच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्यांपैकी एक टाटा ग्रुप आहे. हिंदुत्व आणि कट्टरता एकत्र असू शकत नाही. हिंदू सहिष्णू आहेत. सहिष्णुता आमच्या रक्तात आहे. पण, याचा अर्थ असा नाही की कोणीही येऊन आम्हाला टपली मारुन जाईल. आमच्याशी व्यवहार करायचाय, एकत्र राहायचंय तोपर्यंत आम्ही सहिष्णू आहोत. पण, समोरुन वार केला तर त्याला उत्तर दिले जाणार, इथं मागे पाहणार नाही. तसेच, काही लोक हिंदुत्वाकडे संकुचित नजरेतून पाहतात,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हिंदू संस्कृतीवर भाष्य

प्रथा परंपरांवर आधारित हिंदुत्वाची भाषा आम्ही करत नाही, असे फडणवीस म्हणाले. “राम किंवा कृष्ण यांना देव नाही मानले तरी चालेल पण, येथील संस्कृतीच्या वाहकांना तरी मानलं पाहिजे, त्यांना तुम्ही नाकारु शकत नाही. आम्ही शिकलेलं नितीशास्त्र, संस्कृती याचा आम्ही प्रभू राम आणि श्री कृष्ण यांच्याशिवाय त्याचा विचार नाही करु शकतं. आमच्या हिरोंबाबत ज्यांना वावडं नाही त्या सगळ्यांना आम्ही सामावून घेऊ, मग तो कोणत्याही भाषा, धर्म, जाती किंवा पूजापाठ करणारा असो. हिंदू कधीच संकुचित नव्हता,” असे फडणवीस पुढे म्हणाले.

नेत्यांच्या आश्वासनांबाबत काय म्हणाले फडणवीस?

देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या काळात दिल्या जाणाऱ्या आश्वसनाबाबत बोलताना, “आपल्या लोकशाहीत काही दोष आहेत, त्यापैकी एक म्हणजे जनता आश्वसनं विसरुन जाते याची आपल्या नेत्यांना कल्पना आहे. निवडणुकीत क्या हुआ तेरा वादा असं गाणं कोणी गात नाही, त्यामुळे जबाबदारी स्वीकरली जात नाही. पण, २०१९ मध्ये आम्ही संकल्पपत्रात दिलेल्या आश्वासनातील ९९ टक्के गोष्टी पूर्ण केल्याचा दावा फडणवीस यांनी केला. २०२४ मध्ये केलेल्या गोष्टींचा लेखाजोखा आम्ही जनतेसमोर ठेवला होता,” असेही सांगितले.