मुंबई : समाजातील प्रत्येक घटकाचा विकास झाल्याशिवाय ‘विकसित महाराष्ट्र २०४७’चे ध्येय साध्य होणार नाही. विशेष मुलांना योग्य शिक्षण, संधी आणि पोषक वातावरण उपलब्ध करून देणे ही सामूहिक जबाबदारी आहे. सर्वसमावेशक विकास हाच विकसित महाराष्ट्राचा मुख्य आधारस्तंभ आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केले. ‘दिशा’ अभियानाशी जोडलेल्या राज्यातील सर्व विशेष शिक्षकांचा त्यांच्या योगदानाबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी विशेष शिक्षकांचा प्रातिनिधिक स्वरूपात राज्यस्तरीय सन्मान करण्यात आला. बौद्धिक अक्षमता असलेल्या मुलांसाठी योग्य शिक्षणपद्धती आणि आधुनिक अध्यापन तंत्र विकसित करण्याच्या दृष्टीने ‘दिशा’ अभियान महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
विशेष मुलांचे मूल्यमापन केवळ त्यांच्या शैक्षणिक गुणांवर न करता आत्मविश्वास, स्वावलंबन आणि समाजात समरस होण्याची क्षमता या निकषांवरही झाले पाहिजे. सर्व शाळांमध्ये ‘दिशा’ अभियान स्वीकारणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील ४५० हून अधिक शाळा, २७०० हून अधिक शिक्षक आणि २१ हजारांपेक्षा अधिक दिव्यांग व बौद्धिक अक्षमता असलेले विद्यार्थी या अभियानाशी जोडले गेले आहेत.
‘दिशा’ अभियानाच्या अंमलबजावणीचा नियमित आढावा घेण्यासाठी ‘वॉर रूम’च्या माध्यमातून प्रगती आणि अडचणींचे परीक्षण करण्यात येईल. दिव्यांग कल्याण विभागामार्फत दरवर्षी प्रत्येक विशेष मुलापर्यंत आणि त्याच्या कुटुंबापर्यंत अभियानाची उपयुक्त छापील कार्यपुस्तिका पोहोचविण्यात येणार आहे. नियमित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या बौद्धिक अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांच्या प्रशिक्षणातही या अभ्यासक्रमाचा समावेश करण्यासाठी दिव्यांग कल्याण विभाग आणि जय वकील फाऊंडेशन संयुक्तपणे प्रयत्न करणार आहेत.
