मुंबई: लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य वास्तववादी आहे. त्या काळातील सामाजिक परिस्थिती, अन्याय, संघर्ष आणि कामगारांचे जीवन यांचे प्रभावी चित्रण त्यात दिसून येते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेल्या अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या लेखणीच्या बळावर सामाजिक परिवर्तनाचा संदेश दिला. त्यांच्या साहित्याची व्याप्ती जागतिक स्तरावर पोहोचली आहे.त्यांच्या साहित्याचे २७ भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. राज्याची आणि मराठी भाषेची कीर्ती जगभर पोहोचविण्यात त्यांचे योगदान अमूल्य असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. चिरागनगर येथे त्यांच्या स्मारक व संशोधन केंद्राच्या उभारणीसह भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण हा त्या दिशेने महत्त्वाचा टप्पा असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. हे नाट्यगृह त्यांचा विचार आणि साहित्य पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणारे केंद्र ठरेल.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे वास्तव्य असलेल्या चिरागनगर येथे स्मारक उभारण्याच्या मागणीची पूर्तता करत राज्य शासनाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक आणि संशोधन केंद्र उभारण्याचे काम सुरू केले आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेने नूतनीकरण केलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण होणे, ही आनंदाची बाब आहे. येथे नाट्यप्रयोगांसाठी आवश्यक असलेल्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

क्रांतिसूर्य साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपले आयुष्य शोषित, पीडित, दलित, कष्टकरी आणि वंचित समाजाच्या हक्कांसाठी समर्पित केले. त्यांच्या साहित्याने आणि शाहिरीने सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभी केली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जनजागृती करून जनसामान्यांना प्रेरित करण्याचे ऐतिहासिक कार्य केले, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यावेळी उपस्थित होत्या.

संकुलात अण्णाभाऊ साठे यांचा २० मीटर उंच कांस्य पुतळा उभारणार

३०० कोटी रुपये खर्चाचे अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था संकुलात २० मीटर उंच कांस्य पुतळा उभारणार असून अण्णाभाऊंच्या फकीरा या प्रसिध्द पुस्तकाचे जगातील सर्वात मोठे पुस्तक शिल्प उभारण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.