मुंबई: ज्या राष्ट्रांनी महिलांना शिक्षण, कौशल्य आणि समान संधी दिली, ती राष्ट्रे प्रगतीच्या शिखरावर पोहोचली आहेत. याच विचारातून केंद्र शासनाने मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. ‘सुकन्या समृद्धी आणि एनपीएस वात्सल्य या योजना ही अत्यंत महत्त्वाच्या असून यातून देशातील मुलींना आर्थिकदृष्टया समृद्ध केले जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले.

घाटकोपर येथील एसपीआरजे कन्याशाळा ट्रस्टच्या माध्यमातून एक हजार मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना आणि एनपीएस वात्सल्य अंतर्गत एकूण दोन कोटींच्या धनादेशाचे वितरण फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी ट्रस्टच्या वतीने या उपक्रमाअंतर्गत दहा वर्षांखालील मुलींची ‘सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत तर दहा वर्षांवरील मुलींची ‘एनपीएस वात्सल्य योजना’ अंतर्गत नोंदणी करण्यात आली. एक हजार खात्यांमध्ये प्रत्येकी २० हजार रुपये जमा करण्यात आले असून पुढील दहा वर्षे दरवर्षी तेवढीच रक्कम जमा केली जाणार आहे.

भारतीय संस्कृतीने नेहमीच सभ्य, सुसंस्कृत आणि समताधिष्ठित समाजव्यवस्थेचा पुरस्कार केला आहे. समाजातील प्रत्येक घटकाला, विशेषतः मुलींना शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी शाळा उभारण्याची आणि ज्ञानाची दारे सर्वांसाठी खुली करण्याची परंपरा आपल्या संस्कृतीत आहे. गेल्या शंभर वर्षांत हजारो-लाखो मुलींनी अशा शैक्षणिक संस्थांमधून शिक्षण घेतले. त्या आज विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत आहेत. अशा सामाजिक प्रेरणादायी उपक्रमांची परंपरा नसती, तर अनेक मुली शिक्षणापासून वंचित राहिल्या असत्या असे मुख्यमंत्री म्हणाले.

समाजात एक काळ असा होता की मुलींना ओझे समजण्याची चुकीची मानसिकता निर्माण झाली. त्यातून स्त्री भ्रूणहत्येसारख्या गंभीर सामाजिक विकृती वाढल्या आणि त्याचे दूरगामी परिणाम समाजाला भोगावे लागले. त्यामुळे मुलींचे संरक्षण, शिक्षण आणि आर्थिक सक्षमीकरण ही केवळ शासनाची नव्हे, तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गौरव भंडारी यांच्या सामाजिक बांधिलकीचे विशेष कौतुक केले.

एका व्यक्तीच्या दृढ संकल्पातून समाजात किती मोठा आणि सकारात्मक बदल घडू शकतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे असे ते म्हणाले. या कार्यक्रमाला आमदार प्रसाद लाड, राम कदम, मोनार्क नेटवर्थ कॅपिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव भंडारी, एसपीआरजे कन्याशाळा ट्रस्टचे विश्वस्त मीना खेतानी व पियुष अवलानी आदी उपस्थित होते. या उपक्रमाअंतर्गत एक हजार मुलींच्या खात्यांमध्ये प्रत्येकी २० हजार रुपये जमा करण्यात आले असून पुढील दहा वर्षे दरवर्षी तेवढीच रक्कम जमा करण्यात येणार आहे.