मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात काटकसरीचा सल्ला दिला आहे. त्याची अंमलबजावणी केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर शासकीय वाहनाचा ताफा अर्धा कमी करण्याचे निर्देश सर्व विभागांना दिले आहेत. मंत्री अधिकाऱ्यांचे परदेश दौरे रद्द केले आहेत. काटकसरीचा सल्ला कृतीतून दिला जात आहे.

आज १९ मे रोजी राज्याची मंत्रिमंडळ बैठक सुरू आहे. मंत्रिमंडळ बैठकीला राज्याच्या कानाकोपऱ्यातून मंत्री मुंबईत येतात. त्यांच्यासोबत त्यांचा संपूर्ण स्टाफ येतो. त्यांच्या इंधनावर खर्च होतो. हा खर्च वाचवा यासाठी यानंतर काही काळ उच्च डिजिटल सुरक्षेची तरतूद करून ऑनलाईन मंत्रिमंडळ बैठक घेण्याबाबत विचारविनिमय केला जाणार असल्याचे समजते. मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांनाही ही प्रणाली वापरून मंत्रिमंडळ बैठक उपस्थित राहता येणार आहे. राज्याचे ४२ मंत्री आहे. ते चांद्यापासून बांदापर्यंत पसरलेल्या राज्यातून येतात. मोदी यांच्या आवाहनानंतर काटकसरीच्या कृती मंत्र्यांनी करावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रयत्न चालू आहेत. त्याबद्दल थोड्या वेळात निर्णय घेण्याची शक्यता आहे.