मुंबई : पुढील दोन वर्षांत अर्थव्यवस्थेच्या आकारमानात महाराष्ट्र राज्य सिंगापूर आणि संयुक्त अरब एमिरातला मागे टाकेल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी व्यक्त केला.

भारत आणि अमेरिकेतील आर्थिक, तांत्रिक आणि धोरणात्मक भागीदारीच्या पुढील टप्प्यात महाराष्ट्र केंद्रस्थानी राहणार आहे, समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांचे पहिल्या पसंतीचे ठिकाण (डेस्टिनेशन) ठरेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. कृत्रिम बुद्धिमत्ता, विदा केंद्र, जागतिक सक्षमता केंद्र आणि आधुनिक पायाभूत सुविधांच्या माध्यमातून महाराष्ट्रात भविष्यातील अर्थव्यवस्थेसाठी सक्षम परिसंस्था उभारली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय परिषद २०२६ मध्ये फडणवीस बोलत होते. भारत आणि अमेरिकेतील गुंतवणूक, संशोधन, उत्पादन आणि विकासातील सहकार्य वाढविण्यासाठी ही परिषद महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकेतील गुंतवणूकदारांनी आपल्या कल्पना, संशोधन आणि तंत्रज्ञानासह महाराष्ट्रात यावे. राज्य सरकार त्यांना बाजारपेठ, पायाभूत सुविधा आणि कौशल्ययुक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देईल, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

भारत-अमेरिका भागीदारी ही २१व्या शतकातील अत्यंत महत्त्वाची भागीदारी आहे. तिच्या पुढील टप्प्यात धोरणात्मक आणि आर्थिक सहकार्य वाढणार आहे. या दशकात भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ होत असताना महाराष्ट्र या भागीदारीच्या केंद्रस्थानी असेल. राज्याची अर्थव्यवस्था सध्या सुमारे ६६० अब्ज डॉलरची आहे. मागील सात वर्षांपासून राज्य १०.२ टक्के दराने विकास करीत आहे. राज्यातील सुमारे ६५ टक्के लोकसंख्या २७ वर्षांपर्यंतच्या वयोगटातील असल्याने महाराष्ट्राकडे मोठे तरुण आणि कुशल मनुष्यबळ आहे. उत्पादनापासून मनोरंजन क्षेत्रापर्यंत विविध क्षेत्रांचा अर्थव्यवस्थेतील सहभाग वाढत असून, ही विविधता महाराष्ट्राची मोठी ताकद असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे भारत-अमेरिका सहकार्याला नवे स्वरूप मिळत आहे. जागतिक सक्षमता केंद्र, विदा केंद्र आणि जागतिक पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी दोन्ही देशांना महाराष्ट्राच्या माध्यमातून मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असे फडणवीस म्हणाले. आरोग्य क्षेत्रात भारत हे ‘स्केल इंजिन’ तर अमेरिका ‘इनोव्हेशन इंजिन’आहे. दोन्हींच्या एकत्रित क्षमतेतून महाराष्ट्राच्या मदतीने आरोग्य क्षेत्रात मोठी झेप घेता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नवी मुंबई परिसरात १६५ एकर क्षेत्रावर महाराष्ट्र मेडिसिटी विकसित करण्यात येत आहे. जागतिक दर्जाची अद्ययावत रुग्णालये आणि आरोग्यविषयक सुविधा येथे उभारल्या जात आहेत. भारताच्या एकूण डिजिटल पायाभूत सुविधांपैकी ६५ टक्के सुविधा महाराष्ट्रात आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कंपन्यांसाठी राज्यात मोठ्या संधी असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी भारत-अमेरिका संबंध दृढ असून भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आर्थिक संबंध अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे सांगितले. दोन्ही देश जागतिक आर्थिक वाढीला मोठी गती देऊ शकतात, असेही त्यांनी ते म्हणाले. या परिषदेला उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री दिनेश प्रताप सिंह, इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष अनुप आचार्य यांच्यासह भारत आणि अमेरिकेतील गुंतवणूकदार उपस्थित होते.