मुंबई: मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे. विपुल शब्दसंपदा, समृद्ध साहित्यपरंपरा आणि विविध बोलीभाषांचा वारसा लाभलेल्या मराठीला २१ व्या शतकात डिजिटल आणि ज्ञानभाषा म्हणून अधिक सक्षम करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ आणि ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस’ कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. मराठीचा दैनंदिन व्यवहारातील वापर वाढविण्यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल तंत्रज्ञान, क्वांटम कॉम्प्युटिंग, स्पेस टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजीसारख्या आधुनिक क्षेत्रांमध्येही मराठीचा वापर वाढविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषा व उद्योगमंत्री उदय सामंत, मुंबईच्या महापौर रितू तावडे, विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. हेमलता बागला, मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांच्यासह मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी आणि मराठीप्रेमी उपस्थित होते.

मराठीला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेची अधिकृत मान्यता मिळणे हा मराठी भाषकांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने महाराष्ट्राच्या भाषिक आणि सांस्कृतिक वारशाला राष्ट्रीय पातळीवर विशेष अधोरेखित स्थान मिळाले असल्याचे त्यांनी नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या संकल्पनेसोबत स्वभाषेलाही महत्त्व दिले. राज्यकारभारात मराठीचा वापर वाढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्यातून मराठीच्या प्रशासकीय वापराला नवी दिशा मिळाली, अशी आठवणही फडणवीस यांनी यावेळी करून दिली.

जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा १३वा क्रमांक असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, मराठी ही जागतिक स्वरूपाची भाषा आहे. विसाव्या शतकात तयार झालेल्या मराठी ज्ञानकोश आणि शब्दरत्नाकरामध्ये ११ ते १३ लाख शब्द असल्याचा उल्लेख त्यांनी केला. तुलनेत ऑक्सफर्ड शब्दकोशात सुमारे सहा लाख शब्द, तर मँडरिन, स्पॅनिश आणि फ्रेंचसारख्या भाषांमध्ये साधारण तीन ते साडेतीन लाख शब्द असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारच्या प्रकाशित मराठी शब्दकोशात सध्या सुमारे तीन लाख शब्द आहेत. त्याच्या पुढील आवृत्त्या तयार करून शब्दसंपदा १३ लाख शब्दांपर्यंत नेण्याचे काम करण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधोरेखित केली.

मराठीच्या समृद्ध शब्दसंपदेचा उल्लेख करताना फडणवीस यांनी मराठी ज्ञानकोश आणि शब्दकोशांच्या परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. विविध कोशांमध्ये लाखो मराठी शब्द नोंदविले गेले असून, ही शब्दसंपदा मराठीच्या समृद्ध भाषिक परंपरेचे दर्शन घडवते, असे त्यांनी सांगितले. मराठीचा हा शब्दवैभव केवळ अभिमानाचा विषय न राहता आधुनिक ज्ञाननिर्मितीमध्येही त्याचा प्रभावी वापर झाला पाहिजे. विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, शिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रातील संकल्पना मराठीत उपलब्ध झाल्यास मराठी खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा बनेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

डिजिटल तंत्रज्ञानामुळे संवादाची माध्यमे वेगाने बदलत आहेत. अशा परिस्थितीत मराठीला केवळ पारंपरिक वापरापुरते मर्यादित न ठेवता नव्या तंत्रज्ञानाशी जोडणे आवश्यक आहे. ‘मराठी एआय (AI)’च्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात मराठीचा प्रभावी वापर वाढविणे, डिजिटल माध्यमांवर मराठीतील माहिती आणि ज्ञानसामग्री उपलब्ध करून देणे, तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावर दर्जेदार मराठी कंटेंट मोठ्या प्रमाणात निर्माण करणे गरजेचे असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.

प्रमाण मराठीसोबतच राज्याच्या विविध भागांमध्ये बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषा हा मराठीचा अमूल्य ठेवा असून या बोलींचे साहित्य, लोकपरंपरा आणि भाषिक वैशिष्ट्ये जतन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

मराठीचे जतन आणि संवर्धन केवळ शासकीय उपक्रमांपुरते मर्यादित न ठेवता प्रत्येक मराठी भाषिकाने आपल्या दैनंदिन व्यवहारातून त्यासाठी योगदान देणे आवश्यक आहे. घर, शिक्षण, प्रशासन, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि सामाजिक माध्यमे अशा सर्व क्षेत्रांमध्ये मराठीचा अधिकाधिक वापर वाढला पाहिजे. परंपरेचा अभिमान आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत मराठीला भविष्यातील सक्षम ज्ञानभाषा बनविणे ही सामूहिक जबाबदारी आहे, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

पुढील विश्व मराठी साहित्य संमेलनही लंडनमध्ये

माय मराठी ही केवळ महाराष्ट्राची ओळख नाही, तर आपला स्वाभिमान आहे. संत ज्ञानेश्वरांपासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंतच्या समृद्ध परंपरेने नटलेली मराठी आता सातासमुद्रापार पोहोचली असून, जगभरात तिचा डंका वाजत आहे. भविष्यातही मराठीचा जागतिक विस्तार अधिक वेगाने व्हावा, यासाठी जगातील ५० हून अधिक देशांमध्ये मराठीचा प्रचार आणि प्रसार वाढविण्याचा संकल्प असून, लंडनमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी केंद्र’ उभारण्याबरोबरच पुढील विश्व मराठी साहित्य संमेलनही लंडनमध्ये आयोजित केले जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

तर मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. पुण्यातील डेक्कन युनिव्हर्सिटीमध्ये मराठी भाषेसाठी ‘उत्कृष्टता केंद्र’, लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ‘मराठी वैश्विक केंद्र’, राज्यातील विविध बोलीभाषांचे १०० कोश आणि नऊ ठिकाणी ‘मराठी कौशल्य विकास केंद्र’ उभारण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली.

मराठी भाषेच्या प्रदीर्घ भाषिक वारशाचे संशोधन, जतन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत संक्रमण करण्यासाठी मराठी भाषा विभाग कटिबद्ध आहे, असे विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांनी सांगितले.विश्वकोशातील ज्ञानसंपदा डिजिटल स्वरूपात सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम वेगाने सुरू असून, या महिन्यापासून विश्वकोशाचे काम पूर्णपणे डिजिटल स्वरूपात पोर्टलवर उपलब्ध होणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.