मुंबईः मातृभाषा आणि भारतीय भाषांमधून ज्ञान, संस्कृती व मूल्यांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचतो. अशावेळी एखाद्या भाषेला विरोध करणे, ती भाषा शिकण्यास नकार देण्याच्या भूमिकेमुळे मते वाढतील, खूर्ची मिळेल पण देशाचे ज्ञान समाप्त होईल. ज्ञानदानाची परंपरा येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचणार नाही असा धोक्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सोमवारी येथे दिला.
मुंबई हिंदी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित हिंदी पत्रकारितेच्या २०० व्या वर्षपूर्ती सोहळ्यात फडणवीस बोलत होते. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम, राजहंस सिंह, मुरजी पटेल, संजय उपाध्याय यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
राज्यात गेल्या काही काळापासून हिंदी- मराठी असा वाद रंगला असून पहिलीपासून हिंदी सक्तीच्या भूमिकेला मनसे आणि शिवसेना(ठाकरे) यांनी कडाडून विरोध केल्याने सरकारला माघार घ्यावी लागली होती. त्रिभाषा सूत्र लागू करण्यासाठी समिती नेमण्यात आी होती. या पार्श्वभूमिवर बोलताना फडणवीस यांनी हिंदीला विरोध करणाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. हिंदी ही राजभाषा असून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातही या भाषेचे मोठे योगदान आहे. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी मातृभाषेतील शिक्षण, भारतीय भाषांचे संवर्धन आणि मूल्याधिष्ठित पत्रकारिता यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांच्यातील सांस्कृतिक व ऐतिहासिक संबंधांचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की, ज्ञान, परंपरा आणि संस्कृतीच्या माध्यमातून दोन्ही राज्यांमध्ये शतकानुशतके दृढ संबंध राहिले आहेत. हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषा संस्कृत परंपरेतून विकसित झालेल्या असून देवनागरी लिपीमुळे त्यांच्यात नैसर्गिक जवळीक आहे. भारतीय भाषांचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, जगातील बहुतांश विकसित राष्ट्रांमध्ये मातृभाषेतून शिक्षण दिले जाते.
मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास ज्ञान अधिक प्रभावीपणे आत्मसात करता येते. त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मातृभाषेला प्राधान्य देण्याचे धोरण देशाच्या विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे. प्रत्येकाने आपल्या मातृभाषेबरोबरच इतर भारतीय भाषांचेही ज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन त्यांनी केले.
पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपावर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले की, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल आणि सामाजिक माध्यमांच्या विस्तारामुळे माहिती प्रसारणाचे स्वरूप बदलले आहे. तथापि, कोणती बातमी किती वेगाने प्रसारित झाली यापेक्षा तिची सत्यता आणि विश्वासार्हता अधिक महत्त्वाची आहे. लोकशाहीतील चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, समाजजीवनातील मूल्यांचे जतन आणि लोकशाही संस्थांना बळकटी देण्याचे कार्य पत्रकारिता करत असते. बदलत्या काळातही पत्रकारितेने आपल्या मूलभूत मूल्यांचे जतन करीत समाजहिताची भूमिका कायम ठेवावी.
