मुंबई : नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तारीख निश्चित असून, सर्व विभागांनी विकास आरखड्यातील कामे नियोजित वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करावीत. कामे पुढे ढकलण्याची वृत्ती दूर करुन कुंभमेळ्याच्या ३४ हजार ७३२ कोटी रुपयांच्या विकास आरखड्यातील कामांना गती द्यावी, असे आदेश देतानाच या कामात दिरंगाई झा्ल्यास सबंधितांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिला.सह्याद्री अतिथीगृह येथे नाशिक सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या अनुषंगाने आयोजित बैठकीत फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे,अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कुंभमेळ्यातील कामांची सध्याची परिस्थिती समाधानकारक नसून प्रत्येक विभागाने अधिक वेगाने आणि समन्वयाने काम करण्याची गरज आहे. बैठकीत देण्यात आलेल्या सर्व सूचनांची तातडीने अंमलबजावणी करावी. एक महिन्यानंतर पुन्हा आढावा बैठक घेण्यात येईल. त्या बैठकीपर्यंत कामामध्ये गुणात्मक आणि प्रत्यक्ष प्रगती दिसली पाहिजे. अन्यथा सबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल असे सांगून फडणवीस म्हणाले, विविध विभागांमध्ये प्रभावी समन्वय असणे अत्यंत आवश्यक आहे. विभागांमधील समन्वयाच्या अभावामुळे कोणतेही काम रखडता कामा नये. सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रितपणे काम करून कुंभमेळ्याची तयारी वेळेत पूर्ण करावी. नाशिक महानगरपालिका आयुक्तांनी नाशिकमधील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची आणि रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी गती देण्याचे आदेशही फडणवीस यांनी दिले. निर्धारित वेळेत कामे न करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करावी. विकास कामांचा नागरिकांना त्रास होऊ नये, याची खबरदारी यंत्रणांनी घ्यावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
महानगर गॅस कंपनीने गॅस जोडणीच्या कामांसाठी शहरातील रस्ते खोदून ठेवले असून कंपनीचे काम अत्यंत संथपणे सुरु असल्याबद्दल फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या कंपनीने आतापर्यंत दोन लाख घरांमध्ये पाईप गॅस जोडणी द्यायला हवी होती. पण आतापर्यंत केवळ ४४ हजार कुटुंबाना पाईप गॅस पुरवठा केला असून एकूण ४ लाख घरगुती गॅस जोडणी द्यायची आहे. या कामाची गती वाढविण्याचे आदेश कंपनीला देण्यात आले असून नाशिक महानगरपालिकेशी समन्वय साधून प्रलंबित गॅस कनेक्शनची कामे तातडीने पूर्ण करावीत. सिंहस्थ कुंभमेळा हा राज्याच्या प्रतिष्ठेचा विषय असून, सर्व विभागांनी वेळबद्ध नियोजन, परस्पर समन्वय आणि जबाबदारीची जाणीव ठेवून काम करावे तसेच कुंभमेळ्याची तयारी वेळेत पूर्ण होईल यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी, असेही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.
डांबर नसल्याने कामे रखडली
नाशिमध्ये मोठ्याप्रमाणात रस्त्यांची कामे सुरु आहेत. पण आखाती युद्धामुळे गेल्या तीन महिन्यांपासून डांबर मिळत नसल्याने रस्ते दुरुस्तीची कामे रखडली आहेत. डांबरासाठी आपण केंद्र् सरकारच्या आईल कंपन्याना पत्र लिहिले असून नाशिकसाठी राखीव डांबर साठा ठेवण्याची विनंती केल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
फडणवीस यांनी ‘डिजिटल कुंभ’ संकल्पनेअंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता, ‘कुंभदूत’ एआय सहाय्यक, डिजिटल ट्विन, स्मार्ट पार्किंग, हरवलेल्या व्यक्तींचा शोध, तसेच एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून गर्दी आणि सुरक्षा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याचे आदेश दिले.बैठकीला नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, नाशिकचे सिंहस्थ कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनिषा खत्री, नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यासह नाशिकचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
