Devendra Fadnavis On Uddhav Thackeray and Raj Thackeray : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत युतीची घोषणा करत एकत्रित निवडणूक लढवली. मात्र, तरीही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंना पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, ठाकरे बंधू एकत्र येऊनही मुंबई का जिंकू शकले नाहीत? याची कारणे काय आहेत? याविषयी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं भाष्य केलं आहे.
‘गेल्या ३० वर्षांत मुंबईतील मराठी माणसांसाठी उद्धव ठाकरे काहीही करू शकले नाही, मराठी माणसांना साधं घरंही ते देऊ शकले नाही, त्यामुळे लोकांच्या हे लक्षात आलं की त्यांच्यासाठी कोण महत्वाचं आणि कोण महत्वाचं नाही’, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या पराभवामागचे कारणं सांगितले आहेत. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलत होते.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
ठाकरे बंधू एकत्र येऊनही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव का झाला? या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “सर्वात आधी तर जो मुंबईचा मराठी माणूस आहे, तो देखील हे पाहतो आणि विचार करतो की त्यांनी काय काम केलं. गेल्या ३० वर्षांत मुंबईतील मराठी माणसांना उद्धव ठाकरेंनी काय दिलं? काहीही दिलेलं नाही. मी तर हे म्हणतो की गेल्या १५ वर्षांत उद्धव ठाकरे हे स्वत: मुंबईच्या महापालिकेत लक्ष घालत आहेत, मग मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मी त्यांना खुलं आव्हान दिलं होतं. उद्धव ठाकरे हे त्यांच्या भाषणात मुंबईच्या विकासाबाबत बोलले तर मी १०० रुपये देईल. त्यानंतर मी माझ्या बक्षीसाची रक्कम ३ हजारांपर्यंत वाढवली, तरी देखील उद्धव ठाकरे मुंबईच्या विकासाबाबत काहीही बोलले नाहीत”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
“एवढंच नाही तर मी त्यांना आणखी एक खुलं आव्हान दिलं होतं की, मुंबईत तुमचा एक आयकॉनिक प्रकल्प दाखवा. पण उद्धव ठाकरे हे देखील सांगू शकले नाही. त्यामुळे लोकांना हे समजतं की एवढ्या वर्षांत मुंबईतील मराठी माणूस मुंबईतून बाहेर गेला. तरी ते मुंबईतील मराठी माणसांसाठी फक्त बोलत राहिले, पण एवढ्या मोठ्या महापालिकेवर त्यांची सत्ता असतानाही उद्धव ठाकरेंनी मराठी माणसांना काहीही दिलं नाही. मराठी माणसांना साधं घरही उद्धव ठाकरे देऊ शकले नाही. दुसरीकडे लोकांनी हे पाहिलं की आम्ही लोकांना बीडीडी चाळीचा पुनर्विकासकरून लोकांना घरे दिली. तेव्हा लोकांच्या हे लक्षात आलं की लोकांसाठी कोण महत्वाचं आहे. त्यामुळे आम्हाला मुंबईतील मराठी माणसांनीही मतदान दिलं आणि निवडून आलो”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरेंचा रात्री दोन वाजता फोन आला तर तुमची प्रतिक्रिया काय असेल?
रात्रीच्या दोन वाजता जर तुम्हाला एका प्रायव्हेट नंबरवरून फोन आला आणि तुम्ही तो उचलला, दुसरीकडून फोनवर उद्धव ठाकरे असतील, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर फडणवीस म्हणाले की, “रात्रीच्या दोन वाजता उद्धव ठाकरे फोन करू शकत नाहीत, कारण ते लवकर झोपी जातात आणि जर त्यांचा फोन येणार आहें असं मला आधीच माहिती असेल तर मी ‘दोस्त दोस्त ना रहा’ ही रिंगटोन लावून ठेवेल”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
