देवेंद्र फडणवीसांकडे उपमुख्यमंत्रीपद हे धक्कादायक; शरद पवार यांचा टोला

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणे हे जेवढे धक्कादायक त्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास दिल्लीच्या नेतृत्वाने भाग पाडले हे अधिक धक्कादायक आहे.

देवेंद्र फडणवीसांकडे उपमुख्यमंत्रीपद हे धक्कादायक; शरद पवार यांचा टोला
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

मुंबई : एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणे हे जेवढे धक्कादायक त्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास दिल्लीच्या नेतृत्वाने भाग पाडले हे अधिक धक्कादायक आहे. पण भाजपमध्ये वरिष्ठांच्या आणि नागपूरच्या आदेशाबाबत तडजोड करता येत नाही हे फडणवीस यांनी दाखवून दिल्याचा बोचरा चिमटा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी काढला.

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणे हा आश्चर्यकारक निर्णय असल्याचे ते म्हणाले. शिवसेनेतील ३९ आमदारांचे नेतृत्व करणारे शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदापेक्षा अधिकची मागणी केली असेल. त्यामुळे भाजप नेतृत्वाने हा निर्णय घेतला असेल, कदाचित त्याची कल्पना शिंदेंनाही नसावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.

अधिक धक्कादायक निर्णय हा फडणवीस यांच्या बाबतीतला आहे. ज्यांनी पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळले, आता अडीच वर्षे ते विरोधी पक्षनेते होते, त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले, भाजपच्या वरिष्ठांचा व नागपूरचा हा आदेश असावा आणि नागपूचा आदेश म्हटले की तो तंतोतंत पाळावा लागतो. नागपूरचा आदेश मोडता येत नाही आणि सत्तेत जाण्याची संधी मिळाली तर, ती स्वीकारायची असते, याचे उदाहरण म्हणजे फडणवीस होय, असा टोलाही पवार यांनी हाणला. 

पाहा व्हिडीओ –

एकनाथ शिंदेंचे कौतुक: एका पक्षातील ३९ आमदार घेऊन बाहेर पडणे ही साधी गोष्ट नाही, ती कुवत एकनाथ शिंदे यांनी दाखविली अशा शब्दात पवार यांनी त्यांचे कौतुक केले. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे यांनी मला दूरध्वनी केला होता, त्यांना मी शुभेच्छा दिल्याचे त्यांनी सांगितले.

‘प्राप्तिकर’ची नोटीस

मला प्राप्तिकर विभागाकडून एक प्रेमपत्र आले आह़े  २००४ साली लोकसभा निवडणूक लढवत असताना प्रतिज्ञापत्रात जी माहिती भरली होती, त्याची चौकशी आता करत आहेत, असे पवार यांनी सांगितल़े  २००९ सालीही मी लोकसभेला उभा होतो.  २००९ नंतर २०१४ च्या राज्यसभा निवडणुकीला उभा राहिलो. तसेच २०२० च्या राज्यसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्राबद्दलची नोटीसही आता आलेली आह़े  इतक्या वर्षांची माहिती गोळा करण्यासाठी लक्ष केंद्रित करणे आणि तेही ठराविक लोकांची माहिती गोळा करणे, म्हणजे धोरणात्मक बदल झालेला दिसतो, असा टोला पवारांनी केंद्राला लगावला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Devendra fadnavis post as deputy chief minister is shocking sharad pawar ysh

Next Story
मुंबईत मुसळधार ठिकठिकाणी पाणी साचले
फोटो गॅलरी