Devendra Fadnavis PC : १९९३ मुंबई बॉम्बस्फोटातल्या आरोपींकडून नवाब मलिकांनी साडेतीन कोटींची जमीन २० लाखांत घेतली – फडणवीसांचा बॉम्ब

देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद

devendra fadnavis on nawab malik underworld connection
देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत.

गेल्या महिन्याभरापासून मुंबईत एनसीबी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यामध्ये सुरू असलेला आरोप-प्रत्यारोपाचा खेळ आता शिगेला पोहोचला आहे. नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांनी एकमेकांविरोधात आरोप केले आहेत. एनसीबी आणि समीर वानखेडेंच्या अनुषंगाने भाजपावर देखील आरोप केले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर आता देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्ती, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून साडेतीन कोटींची जमीन फक्त २० लाखांत खरेदी केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. तसेच, सलीम पटेल कोण होता, त्यानं तुम्हाला इतक्या स्वस्तात जमीन का विकली? असे सवाल देखील नवाब मलिक यांना केले आहेत.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

मी घोषणा केली होती की काही गोष्टी दिवाळीनंतर तुमच्यासमोर आणेन. थोडा उशीर झाला. कारण कागद गोळा करत होतो, काहींचे पत्रकार परिषदेचे दिवस आधीच बुक होते. मी सांगणार आहे ती सलीम जावेदची स्टोरीही नाही आणि इंटरव्हलनंतरचा सिनेमाही नाही. फार गंभीर आणि देशाच्या सुरक्षेशी जोडलेला हा मुद्दा आहे.

९३ च्या बॉम्बस्फोटातला आरोपी शहावली खान…

सरदार शहावली खान हा १९९३ चा गुन्हेगार आहे. याला जन्मठेपेची शिक्षा झाली असून तो तुरुंगात आहे. सर्वोच्च न्यायालयाने ती शिक्षा कायम केली आहे. टायगर मेमनच्या नेतृत्वात तो फायरिंगच्या ट्रेनिंगमध्ये सहभागागी झाला. बीएसई आणि पालिकेमध्ये बॉम्ब कुठे ठेवायचे, याची रेकी त्यानी केली होती. टायगर मेमनच्या घरी बॉम्बब्लास्टच्या कारस्थान मांडणीवेळी ते उपस्थित होते. टायगर मेमनच्या घरी गाड्यांमध्ये त्यानी आरडीएक्स भरलं. साक्षीदारांनी याविषयी साक्ष दिल्यानंतर न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली.

हसीना पारकरचा माणूस सलीम पटेल…

मोहम्मद अली इशाक पटेल उर्फ सलीम पटेल. आर. आर. पाटील इफ्तार पार्टीमध्ये गेले होते तेव्हा त्यांची गुन्हेगारासोबत फोटो व्हायरल झाला होता. त्यांचा दोष काही नव्हता. पण ज्या दाऊदच्या माणसासोबत म्हणून त्यांचा फोटो व्हायरल झाला, तो हा सलीम पटेल. तो हसीना पारकरचा बॉडीगार्ड, ड्रायव्हर, फ्रंटमॅनही होता. हसीना पारकरला २००७मध्ये अटक झाली, तेव्हा सलीम पटेललाही अटक झाली. दाऊदनंतर हसीना पारकरच्या नावाने संपत्ती गोळा केली जायची. सलीम पटेलच्या नावाने पॉवर ऑफ अॅटर्नी करून पैसा गोळा केला जायचा. हा सलीम पटेल जमीन लाटण्याच्या धंद्यातला सर्वात प्रमुख माणूस होता.

मलिक यांच्या कंपनीने ही जमीन खरेदी केली

कुर्ल्यामध्ये २.८० एकर म्हणजेच १ लाख २३ हजार स्क्वेअर फूटची जागा जिला गोवावाला कंपाऊंड असं म्हटलं जातं. कुर्ल्यात एलबीएस रस्त्यावर ही जागा आहे. या जमिनीची एक रजिस्ट्री सॉलिडस नावाच्या कंपनीसोबत झाली. मरियमबाई गोवावाला, मुदीरा प्लंबर या दोघांकडून सलीम पटेल हे पॉवर ऑफ अॅटर्नी होल्डर आहे. विक्री करणारा सरदार शहावली खान आहे. म्हणजे या दोघांनी मिळून या जमिनीची विक्री सॉलिडस कंपनीला केली. ही कंपनी नवाब मलिक यांच्या कुटुंबियांची आहे. घेणाऱ्याची सही फराज मलिक नावाच्या व्यक्तीची आहे. या सॉलिडसमध्ये २०१९मध्ये खुद्द नवाब मलिक देखील होते. आजही त्यांच्या कुटुंबाचे लोक त्यात आहेत.

२० लाखात ३ एकरच्या जमिनीचा व्यवहार

कुर्ल्याच्या फोनिक्स मार्केटच्या जमिनीवेळीच एलबीएस रोडवरची ही जमीन रेडीरेकनर रेट ८५०० आणि मार्केट रेट २०५३ रुपये प्रती चौरस फूट दराने घेतली गेली. ही जमीन ३० लाखात खरेदी केली गेली. त्यातही १५ लाखांचं पेमेंट हे मालकाला न मिळता त्यांचा पॉवर ऑफ अॅटर्नी होल्डर सलीम पटेलच्या खात्यात जमा झाले. त्यानंतर १० लाख रुपये शहावली खान ज्याला सरदार खान म्हणतात, त्याला मिळाले. त्यातही ५ लाख नंतर मिळतील असं लिहिलं. म्हणजे २० लाखात एलबीएस रोडवर ३ एकरच्या जमिनीचा व्यवहार झाला.

व्यवहार झाला, तेव्हा नवाब मलिक मंत्री होते

२००३मध्ये हा सौदा झाला, तेव्हा नवाब मलिक मंत्री होते. अंतिम रजिस्ट्री झाली त्याच्या काही दिवस आधी नवाब मलिक यांना पद सोडावं लागलं. पण तुम्हाला माहिती नव्हतं की सलीम पटेल कोण आहे? मुंबईच्या गुन्हेगारांकडून तुम्ही जमीन खरेदी का केली? मुंबईत बॉम्बब्लास्ट करणाऱ्यांकडून तुम्ही जमीन का खरेदी केली? अशा कोणत्या कारणामुळे त्यांनी एलबीएसमधली ३ एकरची जमीन इतक्या स्वस्तात दिली. या आरोपींवर टाडा लागला होता. टाडाच्या कायद्यानुसार आरोपीची सगळी मालमत्ता सरकार जप्त करते. मग टाडाच्या आरोपीची जमीन जप्त होऊ नये, यासाठी तुम्हाला ट्रान्सफर केली गेली का?

मुंबईच्या खुन्यांशी तुम्ही व्यवहार का केले?

या सगळ्या व्यवहारात फार गोंधळ आहे. २००३मध्ये याच मालमत्तेमध्ये ते टेनंट देकील झाले, मग ट्रान्सफर केली, मग पुन्हा खरेदी केली. हा थेट अंडरवर्ल्डशी संबंध दिसतोय. मला या गोष्टीचं दु:ख आहे. मुंबई बॉम्बब्लास्टच्या दुर्दैवी घटनेची तुम्ही आठवण काढा. हा कट ज्यांनी रचला, रेकी केली, आरडीएक्स भरलं अशा व्यक्तीसोबत तुम्ही व्यवहार करता? अशा एकूण ५ मालमत्ता आहेत, ज्यापैकी चारमध्ये १०० टक्के अंडरवर्ल्डचा संबंध आहे. २००५पासून २ वर्षांपूर्वीपर्यंतचे हे व्यवहार आहेत. मुंबईच्या खुन्यांशी तुम्ही व्यवहार का केला?

शरद पवारांनाही कागदपत्र पाठवणार

मी ही कागदपत्र संबंधित यंत्रणेकडे देईन. हे सगळे पुरावे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनाही मी देणार आहे. त्यांनाही कळेल, की त्यांच्या मंत्र्यांनी काय करून ठेवलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Devendra fadnavis press conference allegations nawab malik sameer wankhede ncb pmw