मुंबई : आरे परिसराव्यतिरिक्त अन्यत्र मेट्रो प्रकल्पाची कारशेड उभारणे व्यवहार्य नाही, अशी शिफारस उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीने केली असल्याने आता कोणताही राजकीय अभिनिवेश न ठेवता कारशेड उभारणीस दिलेली स्थगिती उठवावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली.

मेट्रो कारशेड प्रकल्पास विलंब होत असल्याने प्रतिदिन पाच कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होत असून व्यापक जनहिताचा विचार करून कठोर निर्णय घ्यावे लागतात, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

आरे कारशेडला शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध असल्याने महाआघाडी सत्तेवर आल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आहे. कारशेडसाठी अन्यत्र जागा उपलब्ध आहे का व ती व्यवहार्य आहे का, हे तपासण्यासाठी नेमलेल्या समितीने मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडे मंगळवारी अहवाल दिला आहे. त्यासंदर्भात फडणवीस म्हणाले, आमच्या सरकारनेही २०१५ मध्ये उच्चस्तरीय समिती नेमली होती. त्यांनी आरेव्यतिरिक्त अन्य आठ जागांची तपासणी करून तेथे कारशेड उभारणे योग्य होईल का, याचा अभ्यास केला होता आणि त्यानंतरच आम्ही आरेमध्ये कारशेड उभारणीचा निर्णय घेतला होता.  सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने योग्य ठरविला होता व सर्वोच्च न्यायालयानेही स्थगिती दिली नव्हती. त्यामुळे समितीचा अहवाल स्वीकारून स्थगिती उठवावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली.