मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मोठे नेते आहेत. ते चार वेळा मुख्यमंत्री झाले, पण सलग पाच वर्षे कधीच पदावर राहू शकले नाही. सुमारे ४० वर्षांनंतर सलग पाच वर्षे मी मुख्यमंत्री राहिलो, असे प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांना दिले आहे. मावळ येथे गोळीबार पोलिसांनी केला असला, तरी आदेश राज्यकर्त्यांचेच होते, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

पक्षातील नेते व जनतेच्या पाठिंब्यामुळे मी मुख्यमंत्री नाही, असे कधी जाणवत नाही, असे वक्तव्य फडणवीस यांनी केले होते. त्यावर पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रसेच्या नेत्यांनी खोचक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्याला फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. फडणवीस म्हणाले, पवार हे चार वेळा मुख्यमंत्री झाले, तरी त्यांना त्यावेळच्या परिस्थितीमुळे दीड ते दोन वर्षेच पदावर राहता आले. मी सलग पाच वर्षे पदावर राहिलो. मी विरोधी पक्षनेता म्हणूनही समाधानी आहे, हे पाहून महाविकास आघाडी सरकार अस्वस्थ आहे. हीच माझ्या कामाची पावती आहे.