मुंबई : देशात काहींना हिंदू असण्याची लाज वाटते. आता घंटाधारी आणि गदाधारी असे नवीन हिंदूत्व आले आहे, तुम्ही गदाधारी आहात की नाही हे माहीत नाही, मात्र ‘गधाधारी’ निश्चित आहात, अशी खरमरीत टीका  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता  केली.

हिंदूत्व हे संकुचित नसून सहिष्णुता आणि सर्वसमावेशकता असा त्याचा अर्थ आहे. हाच भावार्थ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हिंदूत्व जगत आहेत, असे गौरवोद्गार फडणवीस यांनी काढले.

फडणवीस यांच्या हस्ते ब्लूम्सबरी प्रकाशनद्वारे प्रकाशित ‘अमित शहा आणि भाजपची वाटचाल’ या डॉ. ज्योत्स्ना कोल्हटकर अनुवादित मराठी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पारखी नजर आहे. त्यांना कुठेही दडलेला हिरा शोधून काढता येतो, असे सांगून फडणवीस म्हणाले, अमित शहा वयाच्या १३व्या वर्षी संघाच्या संपर्कात आले. त्यानंतर त्यांनी २१व्या वर्षी भाजपचे काम सुरू केले. ते तरुण वयात वेगवेगळय़ा जबाबदाऱ्या घेत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आ. अतुल भातखळकर यांनी केले. या वेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार आशीष शेलार, मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, पल्लवी जोशी आदी उपस्थित होते.