मुंबई : काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा लढा भाजप किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात नसून भारतीय संविधान आणि त्यातून निर्माण झालेल्या लोकशाही व्यवस्थेविरोधात आहे. देशातील घटनात्मक संस्थांची बदनामी करून त्या मोडीत काढण्याचे षडयंत्र रचले जात आहे, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केला. आमच्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत देशातील राजकीय व्यवस्था आणि संविधान बदलू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

भाजपच्या नेतृत्त्वाखाली महायुतीच्या वतीने सोमवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकशाही बचाव, अराजकता हटाव’ पदयात्रेत फडणवीस बोलत होते. काँग्रेसकडून घटनात्मक संस्थांवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, या संस्थांवरील जनतेचा विश्वास डळमळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. रिझर्व्ह बँक, नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग), संसद, निवडणूक आयोग यांच्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयालाही लक्ष्य केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात मोर्चा काढण्याचा प्रकार यापूर्वी कधी घडला नव्हता. हे संविधानविरोधी कृत्य असल्याचे फडणवीस म्हणाले.

काँग्रेसच्या काळातील घटनादुरुस्त्यांचा दाखला देत फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली. १९७५ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची निवड अवैध ठरवल्यानंतर काँग्रेसने घटनादुरुस्तीच्या माध्यमातून पंतप्रधानांच्या निवडीला न्यायालयीन पुनरावलोकनाच्या कक्षेबाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर १९७६ मध्ये ४२ वी घटनादुरुस्ती करून मूलभूत अधिकारांवर मर्यादा आणण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. त्याच पद्धतीने आता राहुल गांधी यांच्याकडून घटनात्मक संस्थांची बदनामी केली जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

देशात सरकार बदलण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र, राजवट बदलण्याची भाषा म्हणजे केवळ सरकार बदलणे नव्हे, तर देशाची राजकीय व्यवस्था आणि संविधानाने निर्माण केलेल्या संस्थात्मक रचनेत बदल करण्याचा प्रयत्न आहे, असा दावा फडणवीस यांनी केला. बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंकेतील राजकीय घडामोडींचा संदर्भ देत विरोधकांकडूनही राजवट बदलण्याची भाषा केली जात आहे. उद्धव ठाकरे यांनीही अशा भूमिकेला दुजोरा देत आहेत, असे त्यांनी सांगितले.

काँग्रेसच्या लोकशाहीतील एकही संस्था न्याय देत नसेल तर ती मोडून काढा, अशी भूमिका काँग्रेसकडून मांडली जाईल. मात्र, संविधानाने निर्माण केलेली व्यवस्था मोडण्याचा हा प्रयत्न देशासाठी घातक आहे. तथाकथित विचारवंत या मुद्द्यावर मौन बाळगतात आणि केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतात, अशी टीकाही फडणवीस यांनी केली. विरोधकांचे हे इरादे नेस्तनाबूत होईपर्यंत लढा सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीने दिल्लीतील रामलीला मैदानावर भव्य सभा घेतल्यानंतर भाजपने देशभरात ‘लोकशाही बचाव, अराजकता हटाव’ ही मोहीम सुरू केली आहे. याच मोहिमेअंतर्गत सोमवारी मुंबईत दादर ते कामगार मैदान अशी पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, शिवसेनेच्या (शिंदे गट) आमदारांसह भाजपचे मंत्री, आमदार, नगरसेवक आणि पदाधिकारी सहभागी झाले होते.