Devendra Fadnavis मुंबईत ५ डिसेंबर २०२४ या दिवशी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईतल्या आझाद मैदानावर हा सोहळा पार पडला. यानंतर मुंबई महापालिकेने १ हजार ९६३ बॅनर, झेंडे शहरातून काढले आहेत.
मुंबईतून काढण्यात आले १ हजार ९६३ बॅनर्स आणि झेंडे
मुंबई महापालिकेने देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) शपथविधी सोहळा आटोपल्यानंतर दोन दिवसांनी शहरातून १ हजार ९६३ बॅनर्स, फोटो, अभिनंदाचे फलक आणि झेंडे आता काढले आहेत. यातले ७६६ बॅनर्स हे एकट्या आझाद मैदान परिसरात होते. आझाद मैदानात देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यामुळे १ हजार ९६३ बॅनर्स, झेंड्यापैकी ७६३ बॅनर्स हे याच परिसरात होते.
५ डिसेंबरला आझाद मैदानावर पार पडला शपथविधी सोहळा
५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांचा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या आधी म्हणजेच ४ डिसेंबरला देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री होतील ही घोषणा झाली. ज्यानंतर मुंबईतल्या अनेक प्रमुख भागांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदानचे बॅनर्स आणि झेंडे लागले होते. यापैकी आझाद मैदान परिसरात ७६६ बॅनर्स लागले होते. मुंबईकरांना एखादा रिकामा कोपरा हा अभावानेच पाहण्यास मिळत होता. आता हे सगळे बॅनर्स आणि झेंडे उतरवण्यात आले आहेत. भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) अशा तिन्ही पक्षांकडून बॅनर्स आणि झेंडे लावण्यात आले होते. यापैकी काही अनधिकृत बॅनर्सबाबत नागरिकांनी चिंताही व्यक्त केली होती. काही बॅनर्समुळे वाहतुकीची चिन्ह, फूटपाथ आणि ठिकाणांची नावं झाकली जात होती. त्यामुळे लोकांनी चिंता व्यक्त केली होती. आता ही सगळी बॅनर्स उतवरण्यात आली आहेत.
हे पण वाचा- देवेंद्र फडणवीस यांच्याशी केवळ तात्विक मतभेद, एकनाथ खडसे यांची भूमिका मवाळ
आयुक्तांच्या निर्देशानंतर मुंबईत स्वच्छता मोहीम
मुंबईचे आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी अधिकाऱ्यांना मुंबईत स्वच्छता मोहीम राबवण्याच्या सूचना शनिवारी दिल्या. त्यानंतर क्लिन ड्राईव्ह चालवण्यात आला आणि मुंबई महापालिकेने १९६३ बॅनर्स आणि झेंडे उतरवले आहेत. मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार ९१२ झेंडे, ५८३ राजकीय बॅनर्स आणि ४४३ धार्मिक तसंच सामाजिक आशय किंवा संदेश असलेले बॅनर्स उतरवण्यात आले आहेत.
अनधिकृत, धार्मिक, सामाजिक बॅनर्सही काढण्यात आले आहेत
चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातून ६०५ झेंडे आणि ५६ राजकीय बॅनर्स उतरवण्यात आली आहेत. तर १०५ सामाजिक आशय, विषयाशी संबंधिक फलक खाली आणण्यात आले आहेत. शुक्रवारी म्हणजेच ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांचा शपथविधी सोहळा पार पडला त्यादिवशी साधारण ५ हजार किलोंचा कचरा आझाद मैदानातून बाहेर काढण्यात आला. भांडूपच्या एस वॉर्डमधील १४० बॅनर्स काढण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे दादर, माटुंगा, माहीम या ठिकाणांहून १०६ बॅनर्स आणि झेंडे काढण्यात आले आहेत. १५ अनधिकृत व्यावसायिक बॅनर्सही या परिसरातून उतरवण्यात आली आहेत.