scorecardresearch

शिवसेनाप्रमुखांच्या युतीच्या निर्णयामुळे शिवसेना २५ वर्षे सडली का ? ; देवेंद्र फडणवीस यांचा परखड सवाल; मलंगगडाचा प्रश्न तरी सोडवा

शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना व आताही शिवसेनेने कल्याण येथील श्री हाजी मलंगगडाचा प्रश्न सोडविला नाही.

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी युतीचा निर्णय घेतला व ते युतीचे प्रमुख होते. मग त्यांच्यामुळे शिवसेना युतीमध्ये २५ वर्षे सडली, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाटते का, त्यांच्या निर्णयावर बोट ठेवत आहात का, असा परखड सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

शिवसेना युतीत सडली, या वक्तव्याचा पुनरुच्चार ठाकरे यांनी रविवारी केला होता. त्यावर टीकास्त्र सोडून फडणवीस म्हणाले, शिवसेनेच्या जन्माआधी भाजपचा मुंबईत नगरसेवक होता, आमदार होते. मनोहर जोशी यांनी भाजपच्या चिन्हावर लोकसभेची निवडणुक लढविली होती. भाजपबरोबर असताना शिवसेना पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर होती. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चौथ्या क्रमांकावर गेली असून कोणाच्या संगतीत सडत आहे, हे दिसून येते, असा टोलाही लगावला.

शिवसेनेच्या हिंदूत्वाच्या निव्वळ गप्पा आहेत, भाषणापुरते व कागदावरचे आहे आणि राम मंदिर आंदोलनाच्या वेळीही शिवसेना नेते केवळ तोंडाच्या वाफा दडवत होते. हिंदूत्व हे जगायचे असते, असे सांगून फडणवीस म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप नेते-कार्यकर्ते राम मंदिर आंदोलनात व पोलिसांच्या लाठय़ा-काठय़ा खाण्यात आघाडीवर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर, काशी विश्वनाथ मंदिराची उभारणी केली, अनुच्छेद ३७० कलम रद्द केले, त्याबाबतही शिवसेनेची भूमिका संदिग्ध होती. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना व आताही शिवसेनेने कल्याण येथील श्री हाजी मलंगगडाचा प्रश्न सोडविला नाही.

आनंद दिघे व शिवसेनेने त्यासाठी आंदोलने केली, पण काहीच निर्णय घेतला नाही. उस्मानाबाद व औरंगाबादचे नाव बदलले नाही, भाजपने अलाहाबादचे प्रयागराज करून दाखविले. दिल्लीत २०१४ मध्येच भगवा फडकला आहे.  भाजप नेत्यांनी शिवसेनाप्रमुखांना जयंतीदिनी समाजमाध्यमांवर अभिवादन केले, मात्र ज्येष्ठ नेते राहुल गांधी, गांधी कुटुंबीय व अन्य काँग्रेस नेत्यांनी केले नाही. यालाच सत्तेसाठी लाचारी म्हणतात, अशी टीका फडणवीस यांनी केली.

बाबरी मशीद पाडल्यावर देशात शिवसेनेची लाट होती, या मुख्यमंत्री ठाकरे यांच्या मुद्दय़ाचा संदर्भ देऊन फडणवीस म्हणाले, सोयीचा इतिहास सांगायचा व सोयीस्कर विसरायचा, असे मुख्यमंत्री ठाकरे यांचे भाषण होते. शिवसेनेने उत्तर प्रदेशात १९९३ मध्ये १८० उमेदवार उभे केले व १७९ जणांच्या अनामत रकमा जप्त झाल्या.

१९९६ मध्ये २४ पैकी २३ आणि २००२ मध्ये ३९ पैकी ३९ शिवसेना उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या. तरीही शिवसेनेची लाट होती, असे खोटे का बोलता? शिवसेनेला जनतेने नाकारले होते. भाजप हा पहिल्या क्रमाकांचा पक्ष असून तो स्वबळावर सत्तेवर येईल. 

मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा उल्लेख राबडीदेवी केल्यावर भाजप कार्यकर्त्यांच्या घरी लगेच रात्री राज्य सरकारने २५ पोलीस पाठविले. वक्तव्याचे समर्थन नाही. पण तुम्ही चोऱ्या केल्या तर, अंमलबजावणी संचालनालय व सीबीआय कारवाई करणारच, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.

भाजपच्या जन्मापूर्वी शिवसेनेचे आमदार -राऊत

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेला शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना उत्तर दिले. भाजपचा जन्म हा १९८० चा आहे. जनता पक्षाचे पतन झाल्यावरचा. शिवसेनेचा जन्म हा १९६९ चा आहे. शिवसेनेचे पहिले महापौर या मुंबई शहरात डॉ. गुप्ते हे कधी झाले, त्यावेळी आमचे किती नगरसेवक निवडून आले होते? या संदर्भातील एखादे अभ्यास शिबीर आम्ही रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीत ठेवू. जर कोणाला त्याचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना येऊ द्या. शिवसेनेचे पहिले आमदार वामराव महाडिक हे देखील त्याच काळात निवडून आले, शिवसेनेच्या स्थापनेनंतर. गिरगावातून प्रमोद नवलकर हे देखील आमदार म्हणून निवडून आले होते. माझगावमधून छगन भुजबळ हे निवडून आले होते. आमचे वाघ मुंबईतून अनेकदा निवडून आलेले आहेत. भाजपाच्या जन्माच्या अगोदर. आता देवेंद्र फडणवीस यांचा तेव्हा मुंबईशी फारसा संबंध नसेल, महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंध नसेल. कारण या सगळय़ा गोष्टी फडणवीस यांच्या जन्माच्या अगोदरच्या आहेत, असा टोला राऊत यांनी लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणासंदर्भात प्रत्येक शब्दावर भाजप नेत्यांना खुलासा करावा लागत आहे याचा अर्थ ठाकरे यांचे रविवारचे भाषण हे अत्यंत सणसणीत, खणखणीत आणि दणदणीत झालेले आहे आणि त्यामुळे भाजपचे सारे अस्वस्थ आहेत, असा चिमटाही संजय राऊत यांनी काढला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Devendra fadnavis targets uddhav thackeray over sena bjp alliance remark zws

ताज्या बातम्या