मुंबई : राज्यात अभूतपूर्व दुष्काळ पडल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी लंडन येथील गुंतवणूक परिषदेचा दौरा रद्द केल्याचे जाहीर केले आहे. मंत्र्यांनी दौरा रद्द करूनसुद्धा उद्योग विभाग आणि मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ लंडन दौऱ्यावर गेल्याने या दौऱ्याविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे.

‘ग्लोबल इंडिया बिझनेस क्वॉरीडॉर’ या इंग्लंडमधील संस्थेने या गुंतवणूक परिषदेचे आयोजन केले आहे. ‘द सिटी ऑफ क्वांटम अँड एआय’ असा परिषदेचा विषय आहे. ७ आणि ८ ऑक्टोबर रोजी ही परिषद लंडन शहरामध्ये आहे. परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार होते.

 मात्र, २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यामुळे दोन्ही मंत्र्यांनी आपला लंडन दौरा स्थगित केल्याचे आठवड्यापूर्वी जाहीर केले होते. मंत्र्यांनी दौरा रद्द केल्यानंतर अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतला. या शिष्टमंडळाचे नेतृत्व उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बलगन करत आहेत. या शिष्टमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे यांचाही समावेश आहे.

महाराष्ट्राने सध्या अवकाश गुंतवणुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे मागच्या महिन्यात डॉ. पी. अन्बलगन हे फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे भरलेल्या ‘स्पेस फेस्ट’ला उपस्थित होते. उद्योग विभाग शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहे. मात्र, या विभागावर मुख्यमंत्र्यांचे खास लक्ष आहे. देशात येणारी ४० टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात होत असून २०३० पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलर करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष्य आहे.

मागच्या वर्षी दाओस परिषदेत महाराष्ट्राबरोबर १६ लाख कोटींचे सामंजस्य करार झाले होते. दाओसची गुंतवणूक जशी दरवर्षी चर्चेत असते, तसा या परिषदेचा खर्चही चर्चेत राहिला आहे. या सामंजस्य करारावर विरोधकांचे आक्षेप आहेत. लंडनमध्ये होत असलेली परिषद ‘जीआयबीसी’ संस्थेने आयोजित केली आहे, ती संस्था गुंतवणूकदार कंपन्या आणि सरकार यांच्यात दुवा म्हणून काम करते. त्या संस्थेचे सदस्य शुल्क ५ कोटी रुपये आहे. शिष्टमंडळाचा प्रवास आणि इतर खर्च मिळून ऐन दुष्काळातला लंडन दौरा १० कोटींवर गेला. विभाग प्रमुखाला शासकीय दौऱ्यावर जाताना मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांची मंजुरी घ्यावी लागते. त्यामुळे या दौऱ्यालाही शासनाची मंजुरी आहे. यासंदर्भात उद्योग विभागाचे प्रधान सचिव अन्बलगन यांच्याशी संपर्क केला, मात्र त्यांच्याकडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही.