मुंबई: क्रीडा, नवोन्मेष, तंत्रज्ञान, उद्योजकता आणि सांस्कृतिक क्षेत्रातील संधी युवकांना उपलब्ध करून देण्यासाठी पुण्यात ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-२०२६’ या तीन दिवसीय राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन होत आहे. हा महोत्सव देशभरातील युवकांना एकत्र आणणारा महत्त्वाचा दुवा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. क्रीडा क्षेत्रात खासगी गुंतवणूक आणि सार्वजनिक-खासगी भागीदारीला प्रोत्साहन द्यावे, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

या महोत्सवाच्या नियोजनासाठी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा या शासकीय निवासस्थानी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाची बैठक पार पडली. या राष्ट्रीय युवा संमेलनात देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सुमारे एक हजार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशातून ३० ते ३५ युवकांचे प्रतिनिधीमंडळ येणार आहे. राज्यातील ३००, तर अन्य राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील सुमारे ७०० युवकांचा सहभाग या महोत्सवात असेल. याशिवाय तीन दिवसांच्या महोत्सवाला राज्यभरातून एक लाखांहून अधिक युवकांचा सहभाग राहील, यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. पुण्यातील श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे होणाऱ्या या महोत्सवाची रचना ‘वॉरिअर’, ‘फ्युचर’ आणि ‘कल्चरल’ अशा तीन अनुभव क्षेत्रांमध्ये करण्याचे प्रस्तावित आहे.

‘वॉरिअर झोन’मध्ये युवकांमध्ये सामर्थ्य, शिस्त आणि धैर्य निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. स्वसंरक्षण कार्यशाळा, क्रीडा विज्ञान, पोषण, क्रीडा मानसशास्त्रासोबत आर्मी ऑब्स्टॅकल कोर्स, वॉल क्लायम्बिंग, रिअक्शन टाइम अरेना आणि फिटनेससारखे अनुभवाधारित उपक्रम राबविण्यात येतील. महोत्सवासाठी ऑनलाइन नोंदणी, राज्यनिहाय नामनिर्देशन, कागदपत्र पडताळणी, क्युआर कोड आधारित डिजिटल ओळखपत्र, मोबाईल कार्यक्रम मार्गदर्शक आणि थेट सूचना अशा डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या. ‘खेलो इंडिया’अंतर्गत केंद्राकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्राने केंद्राच्या योजनांमध्ये प्रभावी सहभाग घ्यावा, तसेच क्रीडा क्षेत्रात खासगी गुंतवणूक आणि सार्वजनिक-खासगी भागीदारीला प्रोत्साहन द्यावे, असेही फडणवीस यांनी सांगितले. आगामी दशकात महाराष्ट्राला क्रीडा क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी शासनासोबत खासगी क्षेत्राची भागीदारी महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा अजित पवार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते.