‘लालबागचा राजा’, ‘मुंबईचा राजा’ आणि ‘गिरगावचा राजा’ची विसर्जन मिरवणुकीस रविवारी सकाळी साडेआठ-नऊच्या सुमारास सुरुवात झाली आणि बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली. ढोल-ताशाच्या गजरात, गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतशबाजी करीत, ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे बाप्पाला आवाहन करीत ठिकठिकाणाहून गणेश विसर्जन मिरवणुका विसर्जनस्थळाच्या दिशेने मार्गस्थ होऊ लागल्या आणि अवघी मुंबापुरी गणेश नामाने दुमदुमून गेली.
मुंबई उच्च न्यायालयाने रस्त्यामध्ये मंडप उभारणीस केलेल्या बंदीच्या पाश्र्वभूमीवर गणेशोत्सवाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र अनेक गणेशोत्सव मंडळांनी न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करीत रस्त्यामध्ये मंडप उभारून गणेशोत्सव साजरा केला. गेले १० दिवस गणपतीची षोड्शोपचार पूजा केल्यानंतर रविवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशाला निरोप देण्याची वेळ आली. न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन झाले असतानाही मोठय़ा धूमधडाक्यात गणेश विसर्जनाच्या मिरवणुका काढण्यात आल्या. ध्वनीप्रदूषणाचे सर्व नियम धाब्यावर बसवून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कर्णकर्कश्य ढोल-ताशा, डीजे, नाशिकबाजाचा दणदणाट करीत गणरायाला निरोप दिला.
लालबाग मार्केटमधील ‘लालबागचा राजा’ आणि गणेश गल्लीमधील ‘मुंबईच्या राजा’ची मिरवणूक सकाळी साडेआठ-नऊच्या सुमारास सुरू झाली आणि गणेशाला निरोप देण्यासाठी तमाम भाविकांनी लालबागमध्ये धाव घेतली. त्यामुळे लालबाग परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. त्यापाठोपाठ गिरगावमधील निकदवरी लेनमधील ‘गिरगावचा राजा’ आणि मुगभाटमधील ‘गिरगावच्या महाराजा’ची विसर्जन मिरवणूक सुरू झाली आणि गिरगावही भाविकांच्या गर्दीत हरवून गेला. त्यापाठोपाठ हळूहळू ठिकठिकाणच्या गणरायांच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली. सामाजिक संस्था, राजकीय पक्ष आणि स्थानिक नेत्यांनी मिरवणूक मार्गावर पाणपोई, नाश्ता आदींची सोय भाविकांसाठी केली होती. तर विसर्जनासाठी निघालेल्या गणरायावर फुलांचा वर्षांवर करण्यासाठी हौशी नेते मंडळींनी पदपथ आणि रस्त्यांवरच मंडप उभारले होते. या मंडपांमुळे पादचारी आणि गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पदपथावर उभ्या राहणाऱ्या भाविकांना प्रचंड त्रास होत होता. इतकेच नव्हे तर काही मंडप रस्त्यात उभारण्यात आल्याने मिरवणुकींनाही अडचणीचे ठरले होते. परंतु या मंडपांवर पोलीस अथवा पालिकेकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
मुंबईमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तीचे गिरगाव, दादर, जुहू आदी प्रमुख चौपाटय़ांवर विसर्जन केले जाते. हा विसर्जन सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी लाखो भाविकांनी चौपाटय़ांवर गर्दी केली होती. भाविकांना मार्गदर्शन आणि मदतीसाठी पालिकेकडून चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. तसेच पोलिसांनीही चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली होती.
काही सामाजिक संस्थांकडूनही सुविधा आणि सुरक्षेबाबत पालिका व पोलिसांना सहकार्य करण्यात येत होते. रविवारी रात्री उशीरापर्यंत गणेश विसर्जनांच्या मिरवणुका विसर्जनस्थळांच्या दिशेने मार्गस्थ होत होत्या.