मुंबई : भारतातील विमानांमध्ये तांत्रिक बिघाडाच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांत मोठी वाढ झाली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) अधिकृत आकडेवारीनुसार, देशात वर्षभरात ८८९ गंभीर तांत्रिक बिघाड नोंदवले गेले. तांत्रिक बिघाडांची संख्या २०२४ मध्ये ६९२ इतकी होती. वाढती विमान संख्या आणि नियंत्रणामधील त्रुटी हे यामागचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे.

देशांतर्गत हवाई प्रवाशांची संख्या काही वर्षांत वाढली आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक विमानतळावर प्रवाशांची गर्दी दिसून येते. दरम्यान, दररोज काही ना काही तांत्रिक बिघाड, दोष, समस्या निर्माण झाल्याने विमानांचे आपत्कालीन लँडिंग करावे लागत आहे. काही विमानांतील वातानुकूलित यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याचे याआधी निदर्शनास आले आहे. या बिघाडांमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे शिवाय विमानांना पोहोचण्यास विलंब होत असल्याचे दिसून आले आहे. विमानांचे इंजिन, लँडिंग गियर, हायड्रॉलिक प्रणाली आणि इंधन गळतीसारख्या गंभीर समस्या वारंवार समोर येत आहेत. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी विमान कंपन्यांवर कठोर कायदेशीर व दंडात्मक कारवाईचे प्रमाण वाढले आहे.

सूचनांच्या अनुपालनासाठी देखरेख गेल्या वर्षी ४२ प्रकरणांत कारवाई करण्यात आली. ही संख्या २०२४ मध्ये ३१, २०२३ मध्ये २४, २०२२ मध्ये सात, तर २०२१ मध्ये केवळ एक होती. विमानांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी डीजीसीएने विविध सुरक्षा नियम आणि नियामक सूचना लागू केल्या आहेत. त्याच्या अनुपालनासाठी विमान कंपन्या आणि विमानतळ संचालकांवर नियमित देखरेख ठेवली जाते.

विमानांमधील तांत्रिक दोषाची प्रकरणे वर्ष – प्रकरणे

२०२१ – ५१४

२०२२ – ५२८

२०२३ – ४८७

२०२४ – ६९२

२०२५ – ८८९

दोन दिवसांतील घटना

– बुधवारी दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली. विमानात बसल्यानंतर अचानक तापमान वाढल्याने प्रवाशांना त्रास होऊ लागला. श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार काही प्रवाशांनी केली.

– मंगळवारी रात्री इंडिगो ६ई-७२३ हे विमान कोलकाताहून चेन्नईला जात होते. विमानाच्या डाव्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने रात्री ११:२९ वाजता चेन्नई विमानतळावर आणिबाणी जाहीर केली होती. विमानात २२४ जण होते. रात्री ११:३७ वाजता रनवे २५ वर विमान सुरक्षितपणे उतरविण्यात आले.