मुंबई : भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात जानेवारी महिना फारच गोंधळाचा होता. या महिन्यात एकूण पाच लाख १६ हजार २१२ प्रवाशांना प्रवेश (बोर्डिंग) नाकारणे, विमान रद्द होणे आणि विलंब यासारख्या विविध समस्यांमुळे अडचणींचा सामना करावा लागला. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) दिलेल्या माहितीनुसार जानेवारी महिन्यात ९ हजार १५८ तक्रारी दाखल झाल्या. यापैकी निम्यापेक्षा जास्त तक्रारी विमान प्रवासादरम्यानच्या समस्यांशी संबंधित आहेत.

विमान प्रवासाकडे ओढा वाढल्याने प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विमानांचे आगमन आणि उड्डाणांच्या संख्येतही वाढ झाली आहे. यामुळे वाहतूक कोंडी होत असून विमानांना विलंब (लेटमार्क) होत असल्याने प्रवासादरम्यान प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. जानेवारी महिन्यात देशांतर्गत विमान रद्द होण्याचा दर १.४४ टक्के होता. विमानांचे उड्डाण रद्द होण्यामागे खराब हवामान हे एक प्रमुख आणि प्राथमिक कारण आहे. खराब हवामानामुळे विमान रद्द होण्याचे प्रमाण ५८.७ टक्के होते.

देशांतर्गत विमान कंपन्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींमध्ये, उड्डाणांशी संबंधित समस्या प्रामुख्याने होत्या. विलंब झालेल्या विमानांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्याही जास्त आहे. याचा थेट संबंध विमान कंपन्यांच्या ऑन-टाइम कामगिरी अहवालाशी येतो. जानेवारी महिन्यात एअरलाइन्सचा वक्तशीरपणा घसरल्याने प्रभावित प्रवाशांची संख्या देखील खूप जास्त आहे. विविध घटकांमुळे विमान कंपनीच्या कामगिरीवर परिणाम होतो. अनेक वेळा, विमानातील कर्मचारी (क्रू) उशीरा पोहोचल्याने, तर कधी-कधी काही अनपेक्षित घटनांमुळे विलंब होतो.

अडचणींचा सामना करावा लागलेल्या प्रवाशांची संख्या

प्रकार – प्रवासी संख्या (जानेवारी २०२६)

दोन तासांपेक्षा जास्त विलंब – ३,८४,९५९
विमान रद्द – १,२९,९९९
बोर्डिंग नाकारले – १,२५४
एकूण प्रवासी – ५,१६,२१२
डीजीसीएकडे दाखल तक्रारी – ९,१५८