धनगर आरक्षणाची कागदपत्रे उच्च न्यायालयातून गहाळ झालेली नाहीत. मंगळवारी धनगर आरक्षणासंबंधी उच्च न्यायालयात सुनावणीच्यावेळी कागदपत्रे गहाळ झाल्याची अफवा पसरली होती. त्यामुळे न्यायालयात परिसरात सर्वचजण अवाक झाले आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. धनगर आरक्षणासंबंधीची कागदपत्रे मुंबई उच्च न्यायालयातून गहाळ झालेली नाहीत अशी माहिती हेमंत पाटील यांनी दिली. त्यांनी धनगर आरक्षणासाठी याचिका दाखल केली आहे.

मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्या न्यायालयात सर्व याचिका एकत्र करुन त्यावर २७ मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे असे त्यांनी सांगितले. कागदपत्रे गहाळ झाल्याचा आणि सुनावणी पुढे ढकलण्याचा काहीही संबंध नाही असे हेमंत पाटील यांनी सांगितले.

जरी कागदपत्रे गहाळ झाली तरी माझ्याकडे पुरावे आहेत ते मी पुढील सुनावणी दरम्यान कोर्टात सादर करेन असे हेमंत पाटील यांनी सांगितले. धनगर समाजाने संयम सोडू नये आपल्याला एसटीमध्ये प्रमाणपत्र मिळवायचे आहे त्यासाठी न्यायालयीन मार्गाने आपण लढा चालू ठेवू असे त्यांनी सांगितले. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण देऊ असे शासनातर्फे सांगण्यात आले आहे.