मुंबईः धारावी येथे बेस्ट बसमध्ये शिरून पैसांची बॅग चोरण्यासाठी बस वाहकावर चाकूने हल्ला करणाऱ्या आरोपीला धारावी पोलिसांनी चार तासांत अटक केली. शाहबाज खान असे अटक आरोपीचे नाव असून त्याचे चोरलेला वाहकाचा मोबाइल आणि गुन्ह्यांत वापरलेला चाकू पोलिसांनी हस्तगत केला.
पायधुनी – विक्रोळी आगार मार्गावर धावणारी बेस्टची बस क्रमांक ७ गुरूवारी रात्री धारावीमधील पिवळा बंगला परिसरात येताच २० ते २२ वयोगटातील एक तरूण बसमध्ये शिरला. त्याने बस वाहक अशोक डगळे यांच्याकडील पैशाची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. डगळे यांनी प्रतिकार करताच शहबाजने त्यांच्यावर चाकुने हल्ला केला आणि त्यांचा मोबाइल हिसकावून पोबारा केला. या हल्ल्यात डगळे यांच्या मानेच्या खाली, उजव्या खांदयावर, डाव्या मांडीवर व कमरेच्या डाव्या बाजूस गंभीर जखमा झाल्या. डगळे यांच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४) (६), ३११ मपोका. ३७ (अ) (१), १३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. डगळे यांना शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हे ही वाचा…अर्थसहाय्यासह अल्पवयीन पीडितांचे समुपदेशन करणे सरकारचे कर्तव्य, उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
घटनास्थळी सीसी टीव्ही कॅमेरे अथवा कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. त्यामुळे धारावी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विकास शेलार आणि पथकाने खबरींना गुन्ह्याची माहिती देऊन आसपासच्या परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाची तपासणी केली. मात्र गुन्ह्याच्या दृष्टीने त्यांना कोणतीही उपयुक्त माहिती मिळाली नाही. त्यानंतर पोलीस पथकाने खबऱ्यांकडून माहिती मिळविण्यास सुरवात केली. शाहबाज खानने बेस्ट वाहकावर चाकू हल्ला करून चोरी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
हे ही वाचा…आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल! “महायुतीचं सरकार पराभवाला घाबरतंय, त्यामुळेच…”
धारावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शाहबाजचा शोध घेत असताना तो कावळे चाळ परिसरात असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथक तात्काळ तेथे रवाना झाले आणि शाहबाज खानला अटक करण्यात आली. आरोपीने चोरलेला मोबाइल व हल्लासाठी वापरलेला चाकू पोलिसांनी जप्त केला. आरोपी सराईत चोर असल्याचा संशय असून त्याच्या अटकेमुळे इतर गुन्ह्यांची उकलही होण्याची शक्यता आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर कोणतीही ठोस माहिती नसताना आरोपीला चार तासांत मोठ्या शिताफीने अटक करण्यात पोलिसांना यश आले.