मुंबई : धारावी झोपडपट्टीचा कायापालट करण्यासाठी राज्य सरकारकडून धारावी पुनर्विकास प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचे कंत्राट अदानी समूहाला देण्यात आले आहे. अदानी समूहाच्या नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (एनएमडीपीएल) कंपनीकडून प्रकल्पाचे काम केले जात आहे. आता मात्र ही कंपनी एनएमडीपीएलऐवजी एएनडीपीएल म्हणून ओळखली जाणार आहे. कारण आता या कंपनीचे नाव बदलून अदानी नवभारत डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (एएनडीपीएल) असे करण्यात आले आहे.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी धारावीची ओळख पुसून धारावीला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन ओळख देण्यासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या (डीआरपी) निविदा प्रक्रियेत अदानी समूहाने बाजी मारली आहे. अदानी समूहाकडून सध्या पात्रता निश्चितीचे काम सुरू असून पहिल्या टप्प्यातील बांधकामालाही सुरुवात झाली आहे. दरम्यान, अदानी समूहाच्या धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडकडून (डीआरपीपीएल) या प्रकल्पाचे काम केले जात आहे. काही वर्षांपूर्वी या कंपनीच्या नावात अदानी समूहाने बदल केला. डीआरपीपीएलचे नाव बदलून एनएमडीपीएल करण्यात आले. धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडऐवजी नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड करण्यात आले. आता पुन्हा अदानी समूहाने कंपनीच्या नावात बदल केला आहे.

एनएमडीपीएलचे नाव बदलून आता एएनडीपीएल करण्यात आल्याची माहिती अदानी समूहाकडून देण्यात आली आहे. नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडऐवजी आता अदानी नवभारत डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड असे करण्यात आले आहे. हे नाव अदानी कंपनीच्या ओळखीशी जोडले गेल्याने नाव बदलण्यात आल्याचेही अदानी समूहाकडून सांगण्यात आले आहे.