मुंबई : धारावी पुर्नविकास प्रकल्पाला वीज पुरवठा करण्यासाठी अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे परवाना अर्ज सादर केला आहे. सध्या धारावीत बेस्ट वीजपुरवठा करते. अदानीने परवाना अर्ज सादर केल्याने बेस्टचे धाबे दणाणले आहेत. उपक्रमाने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे अदानीला परवाना देऊ नये, यासाठी विरोध दर्शविला आहे. तसेच उपनगरात वीजपुरवठा करण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. यासाठी महिनाभरात सविस्तर आराखडा तयार करणार आहे.
धारावी पुर्नविकासाचे काम सध्या सुरू आहे. पुर्नविकासानंतर येथे वीजपुरवठा करण्यात यावा यासाठी अदानीने प्रयत्न सुरु केले आहेत. अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडने धारावी पुनर्विकास क्षेत्रासाठी वीज वितरण परवान्यात सुधारणा करून हे क्षेत्र आपल्या व्याख्येत समाविष्ट करण्यासाठी परवाना अर्ज केला आहे.
सध्या धारावीत बेस्ट व टाटा पॉवर वीजपुरवठा करतात. हा अर्ज मंजूर झाल्यास ग्राहकांना नवा पर्याय मिळू शकतो. परंतु दुसरीकडे बेस्टचे वीज ग्राहक कमी होऊ शकतात. सध्या शहरात बेस्टचे साडे दहा लाख वीज ग्राहक आहेत. बेस्टच्या विद्युत विभागाने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे बेस्टचे साडे पाच हजार वीज ग्राहक वाढले आहेत. शहरात पुर्नविकासा अंतर्गत अनेक इमारतीचे काम सुरू आहे. या मोठ्या गृहसंकुलांना वीजपुरवठा करण्यासाठी अदानी व टाटा विविध सोयी-सवलती देत आहेत. त्यामुळे शहरातील वीज ग्राहक अदानी-टाटाकडे वळत आहेत. त्यामुळे येत्या काळात बेस्टचे वीज ग्राहक घटण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
शहरात टाटा, अदानीचे वीज जाळे विस्तारत असताना बेस्टनेही वीज ग्राहक वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत सोमवारी झालेल्या बेस्ट समितीच्या सभेत सर्व सदस्यांनी मांडले. तसेच शहरात बेस्टचे विविध ठिकाणी २७ आगार आहेत. उपक्रमाने उपनगरात वीजपुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात असेही नमूद केले आहे. उपनगरात वीजपुरवठा करण्यासाठी उपकेंद्राची उभारणी, पायाभूत सुविधा निर्मितीसह, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे परवान्याकरिता अर्ज करण्याची सूचनाही केली आहे.
धारावी पुनर्विकासात अदानी वीजपुरवठ्याला बेस्टचा विरोध आहे. शहरात बेस्टचे वीज जाळे विस्तारण्यासाठी महिनाभरात आराखडा तयार करण्यात येईल. आराखडा बेस्ट समितीला सादर केला जाईल. वीजपुरवठा, वितरण वाढविण्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या राज्य सरकारकडून घेतल्या जातील. – सोनिया सेठी, महाव्यवस्थापक, बेस्ट
बेस्टचे १० लाख ग्राहक
बेस्टचा वीजपुरवठा प्रामुख्याने कुलाबा ते माहिम व शीव (दक्षिण मुंबई व मध्य मुंबईचा काही भाग) या भागांत होतो. बेस्टचे सध्या साडे दहा लाख वीज ग्राहक आहेत.
