मुंबई : बेस्ट उपक्रमातर्फे धारावीत वीजपुरवठा केला जातो. दरम्यान धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाला वीजपुरवठा करण्यासाठी अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे परवाना अर्ज सादर केला आहे. अदानीने परवाना अर्ज सादर केल्याने बेस्ट उपक्रमाला आपले वीजग्राहक कमी होण्याची भिती वाटत असल्याने उपक्रमाने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे अदानीला परवाना देऊ नये, यासाठी विरोध दर्शविला आहे. तसेच उपनगरात वीजपुरवठा करण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. यासाठी एका महिन्यात सविस्तर आराखडा तयार करण्याचा उपक्रमाने निर्णय घेतला आहे.

मुंबईच्या धारावी पुनर्विकासाचे काम सध्या सुरू आहे. पुनर्विकासानंतर येथे वीजपुरवठा करण्यात यावा यासाठी अदानीने प्रयत्न सुरू केले आहेत. अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडने धारावी पुनर्विकास क्षेत्रासाठी वीज वितरण परवान्यामध्ये सुधारणा करून हे क्षेत्र आपल्या व्याख्येत समाविष्ट करण्यासाठी परवाना अर्ज केला आहे. सध्या धारावीत बेस्ट आणि टाटा पॉवर वीजपुरवठा करतात. हा अर्ज मंजूर झाल्यास ग्राहकांना नवीन पर्याय मिळू शकतो. परंतु दुसरीकडे बेस्टचे वीज ग्राहक कमी होऊ शकतात.

सध्या शहरात बेस्टचे साडे दहा लाख वीज ग्राहक आहेत. बेस्टच्या विद्युत विभागाने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे बेस्टचे साडे पाच हजार वीज ग्राहक वाढले आहेत. शहरात पुनर्विकासाअंतर्गत अनेक इमारतीचे काम सुरू आहे. या मोठ-मोठ्या गृहसंकुलांना वीजपुरवठा करण्यासाठी अदानी आणि टाटा विविध सोयी-सवलती देत आहेत. त्यामुळे शहरातील वीज ग्राहक अदानी-टाटाकडे वळत आहेत. त्यामुळे येत्या काळात बेस्टचे वीज ग्राहक घटण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. शहरात टाटा, अदानीचे वीज जाळे विस्तारत असताना बेस्टने देखील वीज ग्राहक वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत सोमवारी झालेल्या बेस्ट समितीच्या सभेत सर्व सदस्यांनी मांडले.

साडेदहा लाख वीज ग्राहक

शहरात बेस्टचे विविध ठिकाणी २७ आगार आहेत. शहरात अदानी, टाटा आपला विस्तार करीत असताना उपक्रमाने उपनगरात वीजपुरवठा करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात असेही नमूद केले आहे. उपनगरात वीजपुरवठा करण्यासाठी सबस्टेशन उभारणे, पायाभूत सुविधा निर्मितीसह महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे परवान्याकरिता अर्ज करण्याची सूचना देखील केली. बेस्टचा वीजपुरवठा प्रामुख्याने कुलाबा ते माहीम आणि शीव (दक्षिण मुंबई आणि मध्य मुंबईचा काही भाग) या भागात होतो. बेस्टचे सध्या साडेदहा लाख वीज ग्राहक आहेत.

एका महिन्यात आराखडा तयार करा

धारावी पुर्नविकासात अदानीच्या वीज पुरवठ्याला बेस्टचा विरोध आहे. शहरात बेस्टचे वीज जाळे विस्तारण्यासाठी येत्या एका महिन्यात आराखडा तयार करण्यात येणार आहे. आराखडा बेस्ट समितीला सादर केला जाईल. वीजपुरवठा, वितरण वाढविण्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या राज्य सरकारकडून घेतल्या जातील. – सोनिया सेठी, महाव्यवस्थापक, बेस्ट