मुंबई : अपुरी कागदपत्रे किंवा अन्य कारणांमुळे सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण न केलेल्या धारावीकरांना राज्य सरकारने पुन्हा एक संधी उपलब्ध करून दिली आहे. सर्व लाभार्थ्यांना पुनर्विकासात सामावून घेण्याच्या उद्देशाने, धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या (डीआरपी) वतीने ‘दस्तावेज संकलना’साठी १ ते १५ नोव्हेंबर या काळात विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोहिमेत सहभागी होणाऱ्या पात्र धारावीकरांना त्यांचे आवश्यक दस्तावेज डीआरपीसमोर सादर करून सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे.
प्रत्येक पात्र कुटुंबाचा सहभाग निश्चित करतानाच एकही लाभार्थी कुटुंब पुनर्विकासापासून वंचित राहू नये, यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या या विशेष मोहिमेचा लाभ अधिकाधिक रहिवाशांनी घ्यावा, असे आवाहन डीआरपीने केले आहे. या मोहिमेत अपूर्ण अथवा अंशतः पडताळणी झालेल्या प्रकरणांची नोंद पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. सर्व रहिवाशांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन संकलन केंद्रांवर आवश्यक दस्तावेज जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
धारावीतील सर्व झोपडीवासीयांना घरं मिळणार आहे. त्यानुसार २००० पर्यंतच्या पात्र झोपडीवासीयांना धारावीत तर २०११ पर्यंतच्या झोपडीवासीयांना सशुल्क आणि उर्वरित सर्व झोपडीवासीयांना भाडेतत्त्वार घरे दिली जाणार आहेत. ही घरे नंतर संबंधितांना विकत घेता येणार आहेत. त्यासाठी धारावीबाहेर डीआरपीला ५४१ एकर भूखंड राज्य शासनाकडून दिला जाणार आहे. त्यापैकी ६२.५ एकर भूखंडाचा ताबा डीआरपीला मिळाला आहे. त्यामध्ये कुर्ला येथील दुग्धशाळा आणि मुलुंडमधील खाजण भूखंडाचा समावेश आहे.
आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून आपल्या सदनिकांचे सर्वेक्षण पूर्ण केलेल्या धारावीकरांना प्राधान्य देण्यासाठी, परिशिष्ट दोन (नियोजित पात्रता यादी) जारी करण्यास सुरुवात केली आहे. ज्यांचे सर्वेक्षण अद्याप सुरू आहे किंवा नुकतेच पूर्ण झाले आहे, त्यांचा समावेश पुढील यादीत करण्यात येणार आहे, असे डीआरपीने स्पष्ट केल आहे.
आतापर्यंत धारावीतील एक लाखाहून अधिक रहिवाशांनी सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, विविध कारणांमुळे सर्वेक्षणात सहभागी न झालेल्या रहिवाशांना या प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी दस्तावेज संकलन मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
डीआरपी आणि नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (एनएमडीपीएल) च्या सहाय्याने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत, उपजिल्हाधिकारी, तहसिलदार आणि सर्वेक्षण अधिकारी यांच्या नेतृत्वात धारावीमध्येच विभागनिहाय तात्पुरत्या कार्यालयांची उभारणी करण्यात येणार आहे.
दस्तावेजांचे संकलन, पडताळणी आणि तक्रार निवारण अशा पद्धतीचे काम या कार्यालयांतून केले जाईल. घरोघरी जाणारे सर्वेक्षण अधिकारी आणि मध्यवर्ती कॉल सेंटरच्या माध्यमातून या मोहिमेचा कालावधी, आवश्यक दस्तावेज आणि अन्य माहिती रहिवाशांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था एनएमडीपीएलकडून करण्यात येणार आहे. ही मोहीम निर्धारित केलेल्या कार्यालयांमध्ये सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत राबविली जाणार आहे.
दस्तावेज संकलन केंद्रे पुढीलप्रमाणे
- शालीमार इंडस्ट्रीयल इस्टेट, टाटा पॉवर जवळ, टी.एच. कटारिया मार्ग. माटुंगा लेबर कॅम्प.
- १०१/१०२,ओ विंग, कामराज स.गृ.संस्था, के. के. कृष्णन मेनन मार्ग, बालाजी नगर, धारावी.
- एनएमडीपीएल. स्कील सेंटरच्या वर, बाबासाहेब आंबेडकर स्कूल जवळ, एम. पी. नगर, धारावी.
