मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत धारावी पुनर्वसन प्रकल्पाकडून (डीआरपी) पात्रता निश्चिती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेअंतर्गत मोठ्या संख्येने धारावी रहिवाशांच्या पात्रतेची प्रकरणे प्रलंबित आणि अनिर्णित आहेत. अशी प्रकरणे तातडीने मार्गी लावून रहिवाशांची योग्य प्रकारे पात्रता निश्चिती करण्याची मागणी धारावीकरांकडून केली जात आहे. या मागणीच्या अनुषंगाने आता डीआरपीने धारावीत वेगवेगळ्या ठिकाणी विशेष शिबिरांचे आयोजन करून प्रकरणांचा निपटारा करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार आजपासून (१४ मे) शिबिरांना सुरुवात होणार आहे. १४ ते २६ मेदरम्यान धारावीत शिबिरे पार पडणार आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांची पात्रता निश्चिती करण्यासाठी डीआरपी आणि नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (एनएमडीपीएल)कडून बायोमेट्रिक सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणाअंतर्गत रहिवाशांची कागदपत्रे जमा करून त्यांची पडताळणी केली जात असून रहिवाशांची पात्रता निश्चित केली जात आहे. पात्रता निश्चिती जसजशी पूर्ण होत आहे, त्यानुसार परिशिष्ट-२ प्रसिद्ध केले जात आहे.

मात्र या पात्रता निश्चिती प्रक्रियेवर मोठ्या संख्येने धारावीकरांचा आक्षेप आहे. अधिकाधिक रहिवाशांना अपात्र ठरवून त्यांना धारावीबाहेर फेकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही होत आहे. तर दुसरीकडे प्रलंबित आणि अनिर्णित प्रकरणांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे अशा प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी आता डीआरपीने विशेष शिबिरे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

या शिबिरांच्या माध्यमातून एक खिडकी पडताळणी करून प्रकरणे मार्गी लावण्याचा प्रयत्न डीआरपीचा असणार आहे. या शिबिरांत स्थानिक नगरसेवकांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. त्यामुळे या शिबिरांना प्रलंबित आणि अनिर्णित प्रकरणे असलेल्या धारावीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आपली पात्रता निश्चिती करून घ्यावी, असे आवाहन डीआरपीकडून करण्यात आले आहे.

शिबिरांचे वेळापत्रक व स्थळे :

१४ व १५ मे – सेक्टर १ पिंजरा हॉल, सेंट्रल/वेस्टर्न रेल्वे कॉलनी, हनुमान नगर, माटुंगा (पूर्व) (रेल्वे जमीन व झोन ७) १८ व १९ मे – सेक्टर ३ शेड कॉम्प्लेक्स, धारावी पोलीस स्टेशनमागे, ब्लॉक क्रमांक ५, ट्रान्झिट कॅम्प, इंदिरा नगर, धारावी १९ व २० मे – सेक्टर २ शेड कॉम्प्लेक्स, धारावी पोलीस स्टेशनमागे, ब्लॉक क्रमांक ५, ट्रान्झिट कॅम्प, इंदिरा नगर, धारावी २० व २१ मे – सेक्टर ४ म्हाडा कॉलनी, इमारत क्रमांक ५, धारावी डेपो रोड, पीएमजीपी कॉलनी, आंबेडकर नगर, धारावी २१ व २२ मे – सेक्टर ५ म्हाडा कॉलनी, इमारत क्रमांक ५, धारावी डेपो रोड, पीएमजीपी कॉलनी, आंबेडकर नगर, धारावी २५ व २६ मे – सेक्टर १ पिंजरा हॉल, सेंट्रल/वेस्टर्न रेल्वे कॉलनी, हनुमान नगर, माटुंगा (पूर्व) (झोन क्रमांक १, ३, ४, ५ व ६)