मुंबई : धारावी पुनर्वसन प्रकल्पात पुनर्वसनातील तसेच भाड्याच्या सव्वा ते दीड लाख घरांची निर्मिती करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यापैकी धारावीत प्रत्यक्षात ५८ हजार निवासी व साडे तेरा हजार अनिवासी सदनिका बांधल्या जाणार आहेत. धारावी पुनर्विकासाशी संबंधित सूत्रांनी ही माहिती दिली. अदानी समूहाच्या नवभारत मेगा डेव्हलपर्स लि यांच्यामार्फत हा प्रकल्प राबविला जात आहे.

धारावीतील प्रत्येक रहिवाशाला घर दिले जाणार आहे. मात्र पात्र रहिवाशांना धारावीत घर मिळणार आहे. उर्वरित सर्व रहिवाशांना धारावीबाहेर मालकी हक्काने तसेच भाडे तत्त्वावर घरे दिली जाणार आहेत. याशिवाय व्यवसायासाठी तळमजल्यावरच सदनिका उपलब्ध होणार असल्याची माहिती धारावी पुनर्विकास प्रकल्पातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

धारावी प्रकल्पात पात्र रहिवाशांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा प्रचार सध्या सुरु असल्यामुळे धारावीकरांमध्ये खळबळ माजली आहे. मात्र तळमजल्यावरील सर्वच रहिवाशांना धारावीतच घरे मिळणार आहेत. त्यांची पात्रता सध्या अनिर्णित असली तरी ती लवकरच मार्गी निघेल, असा विश्वासही प्राधिकरणाचे सचिव विपिन पालीवाल यांनी व्यक्त केला.

सुमारे ६२१ एकरवर पसरलेल्या धारावीत महिम निसर्ग उद्यान, मिठी नदी, रेल्वे संरक्षित परिसर, किनारा नियमन क्षेत्र, उच्चदाबाच्या वीजवाहिन्या, रस्ते, मोकळी मैदाने, विमानतळ प्राधिकरणाने घातलेली इमारत उंचीची मर्यादा आणि इतर वगळलेल्या भूखंडांचा विचार केल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामासाठी केवळ सुमारे २७० एकर भूखंड उपलब्ध होणार आहे.

यापैकी ५० टक्के भूखंड पुनर्वसनासाठी वापरला जाणार आहे. पुनर्वसनाअंतर्गत ५८ हजार तर औद्योगिक व व्यावसायिक अशा साडेतेरा हजार सदनिका अशा पुनर्वसनाच्या एकूण ७२ हजार सदनिका उभारल्या जाणार आहेत. सध्या करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार, धारावी परिसरात सव्वा लाख इतकी बांधकामे असतील, असा अंदाज आहे.

प्रचलित धोरणानुसार, २००० पर्यंतच्या तळमजल्यावरील पात्र रहिवाशांना धारावीमध्येच ३५० चौरस फूट घरे विनामूल्य मिळणार आहेत. २००० ते २०११ या कालावधीतील तळमजल्यावरील पात्र रहिवाशांना धारावीमध्ये किंवा मुंबई महानगर परिसरात ३०० चौरस फुटांची घरे अडीच लाखांत दिली जाणार आहेत.

याशिवाय २०११ नंतर प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आलेल्या १५ नोव्हेंबर २०२२ या अंतिम मुदतीपर्यंतच्या सर्व तळमजल्यावरील आणि वरच्या मजल्यांवरील पात्र रहिवाशांना मुंबई महानगर परिसरात भाडे-खरेदी तत्त्वावर ३०० चौरस फुटांची घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अपात्र धारावीकरांसाठी धारावीबाहेर कुर्ला डेअरी (२१ एकर), मुलुंड (५८ एकर), देवनार (१२४ एकर), अक्सा, मालवणी (१४० एकर), कांजुरमार्ग (१२० एकर) आणि भांडूप (७६ एकर) येथे भूखंड वितरीत झाले आहे. या भूखंडावर धारावीकरांसाठी भाडे तत्त्वावरील घरे बांधली जाणार आहेत, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

इमारतींचा रचना कशी असेल?

पुनर्विकास आराखड्यात धारावीतील पारंपरिक संस्कृती जपणाऱ्या मिश्र वापराच्या इमारती प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. या नुसार तळघरात पार्किंग, तळमजल्यावर किरकोळ आणि व्यावसायिक दुकाने तसेच शोरूम्स, पोडियम स्तरावर लघुउद्योगांसाठी जागा आणि त्यावरील मजल्यांवर निवासी घरे अशी रचना प्रस्तावित आहे.