मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पातील सर्वच सरकारी, निमसरकारी भूखंड ताब्यात घेण्याच्या सुरु झालेल्या प्रक्रियेविरोधात धारावीवासीयांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. या निमित्ताने राखीव भूखंडही धारावी पुनर्विकासासाठी सुपूर्द करणार का? असा सवाल माजी आमदार बाबुराव माने यांनी विचारला आहे.
या निर्णयाचा पहिला फटका माने यांच्या महात्मा ज्योतिबा फुले ट्रस्टला बसला आहे. या ट्रस्टअंतर्गत शाळादेखील चालविली जाते. मोकळा भूखंड हा खेळाचे मैदान म्हणून राखीव आहे. या मैदानाचा भाडेपट्टा संपुष्टात येण्यासाठी दोन ते तीन वर्षांचा कालावधी बाकी आहे. तरीही म्हाडाने नोटिस जारी केली आहे. आतापर्यंत एकदाही म्हाडाने अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याची नोटिस दिली नाही.
आता अचानक २८ वर्षांनंतर म्हाडाला साक्षात्कार झाला आहे. याबाबत म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण मंडळाच्या सहमुख्य अधिकाऱ्यांकडे दोन वेळा सुनावणी झाली. आमची बाजू आम्ही मांडली. परंतु ती मान्य केली जात नव्हती, असे आढळून आले. हा भूखंड ताब्यात घेण्याच्या दिशेनेच सहमुख्य अधिकारीही वावरत होते, असा आरोप माने यांनी केला आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पात अद्याप एकही झोपडी रिक्त करण्यात आलेली नाही. अशा वेळी भूखंड ताब्यात घेण्याची मात्र घाई केली जात आहे. हे आरक्षित भूखंड या प्रकल्पासाठी वापरता त्यावरील आरक्षण कायम ठेवणार की रद्द करुन अदानी समुहाला आंदण देणार हे कळायला मार्ग नाही, असेही माने यांनी म्हटले आहे. आपण या प्रकल्पाला विरोध करीत असल्यामुळे सूड उगविण्यासाठी भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया म्हाडाने सुरु केली, असा आरोपही त्यांनी केला.
याबाबत शहर विभागाचे कार्यकारी अभियंता नीतीन शिंदे यांना विचारले असता, या भूखंडाचा व्यापारी वापर करता येणार नाही, या अटीचा भंग करण्यात आला आहे, असे सांगितले. हा भंग आताच कसा दिसला? हा व्यापारी वापर मुळीच नाही, असेही माने यांनी सांगितले.
अदानी समुहाची नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रा. लि. ही ८० टक्के सहभाग असलेली विशेष हेतू कंपनी धारावीचा पुनर्विकास करीत आहे. यामध्ये राज्य शासनाचा २० टक्के वाटा आहे. या प्रकल्पासाठी ९५ हजार कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे धारावीच्या बृहद्आराखडात नमूद आहे. अदानी समुहाने आतापर्यंत साडेचार हजार कोटी खर्च केले आहेत. सध्या रेल्वेच्या भूखंडावर पुनर्वसन इमारतींचे काम सुरु आहे. अशा वेळी भाडेपट्टा कराराचे भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु झाल्याने रहिवाशांमध्ये अस्वस्थता आहे. धारावीतील पात्र व अपात्र अशा सर्वच रहिवाशांचे सर्वेक्षण अथिम टप्प्यात आहे. धारावीत पात्र रहिवाशांना घरे मिळणार असून उर्वरित अपात्र रहिवाशांना धारावीबाहेर घरे दिली जाणार आहेत.
