मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाने (डीआरपी) धारावी पुनर्विकासाला वेग देण्याचा निर्णय घेतला असून टप्प्याटप्प्याने घरे रिकामी करून घेत त्या ठिकाणी पुनर्वसित इमारतींच्या बांधकामाला सुरुवात करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली आहेत. धारावीतील शाहू नगरमधील ९०० रहिवाशांना घरे रिकामी करण्यासंबंधीच्या नोटिसा बजावण्यास मुंबई महापालिकेने सुरुवात केली आहे.

या नोटिशींच्या अनुषंगाने आता डीआरपीने स्थलांतराच्या प्रक्रियेस सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार काही रहिवाशांना संक्रमण शिबिराच्या गाळ्यांमध्ये स्थलांतरित केले जाणार आहे. तर काहींना घरभाड्याचा पर्याय दिला जाणार आहे. रहिवाशांना दर महिना २२ हजार ते ३० हजारांपर्यंत घरभाडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

धारावी पुनर्विकासाअंतर्गत रेल्वेच्या जागेवर पहिल्या टप्प्यात पुनर्वसित इमारतींची कामे सध्या सुरू आहेत. आता पुनर्वसित इमारतींच्या कामाला वेग देण्याचा निर्णय डीआरपीने घेतला आहे. त्यानुसार शाहू नगरमधील रहिवाशांना स्थलांतरित केले जाणार आहे. शाहू नगरमधील ९०० रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजावण्यास सुरुवात झाल्यानंतर आता डीआरपीने या रहिवाशांच्या स्थलांतरासाठीच्या प्रक्रियेस वेग दिला आहे.

डीआरपीकडून मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडाकडून सेक्टर-५ मध्ये काही इमारती बांधण्यात आल्या आहेत. या इमारती डीआरपीकडे वर्ग झाल्या असून या इमारतीतील ५०० गाळे संक्रमण शिबिराचे गाळे म्हणून ५०० रहिवाशांना वितरित केले जाणार आहेत. तर उर्वरित ४०० रहिवाशांना घरभाड्याचा पर्याय दिला जाणार आहे. ज्या रहिवाशांचे घर २७५ चौ. फुटांपर्यंत आहे, त्यांना दरमहा २२ हजार रुपये इतके घरभाडे दिले जाणार आहे. तर ज्यांचे घर २७५ ते ३७५ चौ. फुटांपर्यंत आहे, त्यांना दरमहा ३० हजार रुपये घरभाडे दिले जाणार आहे. या घरभाड्यात दरवर्षी ५ टक्क्यांची वाढ होणार आहे.

रहिवाशांना घरभाड्याचा पर्याय देतानाच घरे रिकामी करण्यासाठी १५ हजार रुपये

स्थलांतर शुल्क दिले जाणार आहे. दरम्यान, धारावी पुनर्विकासाअंतर्गत किमान ५०० चौ. फुटांचे घर किंवा त्यांच्या घराच्या क्षेत्रफळाच्या १.३२ पट (ज्यापैकी जास्त असेल ते) क्षेत्रफळाचे घर दिले जाणार आहे. रहिवाशांचे स्थलांतर योग्य पद्धतीने आणि सुलभपणे व्हावे, तसेच पुनर्वसित इमारतींच्या बांधकामाला वेग देण्यास डीआरपीकडून प्राधान्य दिले जाणार असल्याचेही डीआरपीकडून स्पष्ट करण्यात आले.

…………………..