मुंबई : धारावी पुनर्विकासाअंतर्गत धारावीकरांना ५०० चौ. फुटांचे घर द्यावे, यासह अन्य काही मागण्या धारावीकरांकडून करण्यात आल्या आहेत. तर मिठागराच्या जागेसह कुर्ला दूध डेअरीच्या जागेवरील धारावी पुनर्वसन रद्द करावे, अशी मागणी मुलुंड आणि कुर्लावासीयांनी केली आहे. मात्र या मागण्यांविषयी राज्य सरकार उदासीन असल्याने आता धारावीकर, मुलुंडवासी आणि कुर्लावासीयांनी धारावी पुनर्विकासाविरोधातील आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्टला धारावी, मुलुंड पूर्व आणि कुर्ला दूध डेअरी येथे तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर १० दिवसांनी एकत्रित आंदोलन करण्यात येणार आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या (डीआरपी) माध्यमातून धारावीचा पुनर्विकास केला जात आहे. या पुनर्विकासाअंतर्गत झोपडपट्टीवासीयांना ३५० चौ. फुटांचे घर दिले जाणार आहे. तर अपात्र रहिवाशांचेही पहिल्यांदाच पुनर्वसन या प्रकल्पाअंतर्गत केले जाणार आहे. अपात्र रहिवाशांना मुंबईतील विविध ठिकाणी भाडेतत्त्वावरील गृहयोजनेत घरे दिली जाणार आहेत. मात्र याला धारावीकरांचा, धारावी बचाव आंदोलनाचा विरोध आहे. धारावीकरांना ३५० चौ. फुटांऐवजी ५०० चौ. फुटांची घरे देण्याची मागणी धारावी बचाव आंदोलनाने केली आहे. तर अपात्रांसह सर्वच धारावीकरांचे धारावीतच पुनर्वसन करावे, कोणालाही अपात्र ठरवून धारावीबाहेर फेकू नये, अशीही धारावी बचाव आंदोलनाची मागणी आहे.
मात्र ही मागणी मान्य होताना दिसत नाही. त्यात दुसरीकडे मुलुंड पूर्व येथील मिठागराची ४२.५१ एकर जागा धारावीसाठी डीआरपीकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. मुलुंड कचराभूमीची आणखी १५ एकर जागा पाच वर्षांच्या भाडेतत्त्वावर धारावीसाठी देण्यात आली आहे. धारावीकरांचे मुलुंडमध्ये पुनर्वसन करण्यास, पर्यावरणाचा ऱ्हास करण्यास मुलुंडवासीयांचा विरोध आहे. यासाठी मुलुंडवासीयांकडून आंदोलन केले जात असून यासाठी न्यायालयीन लढाईही लढली जात आहे. तसेच कुर्ला मदर डेअरीची जागाही धारावीसाठी देण्यास कुर्लावासीयांचा विरोध आहे. पण राज्य सरकार मात्र रहिवाशांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून प्रकल्प पुढे रेटत आहे. त्यामुळे आता धारावीकर, मुलुंडवासी आणि कुर्लावासी आक्रमक झाले आहेत.
शिवसेनेचे (ठाकरे) नेते, आमदार आदित्य ठाकरे यांची मुलुंड, कुर्ला, धारावीतील रहिवाशांबरोबर गुरुवारी एक बैठक पार पडली. यावेळी धारावी पुनर्विकासाविरोधातील आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुलुंडमधील रहिवासी ॲड. सागर देवरे यांनी दिली. त्यानुसार १५ ऑगस्टला धारावी, मुलुंड आणि कुर्ला येथे तिरंगा रॅली काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. धारावीत दुपारी ३ वाजता मुकुंदनगर येथील संविधान चौक येथून तिरंगा रॅली निघेल आणि शिवनारायण बावडी येथे येऊन संपेल. त्यानंतर येथे सभा होईल. या रॅलीत धारावीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक, माजी आमदार बाबूराव माने यांनी केले आहे. ५०० चौ. फुटांचे घर, शाहूनगरवासीयांचे शाहूनगरमध्येच ७५० चौ. फुटांचे घर देऊन पुनर्वसन करावे, जबरदस्ती घरे रिकामी करू नयेत, यासह अन्य मागण्यांसाठी तसेच धारावीबाहेर धारावीकरांचे पुनर्वसन करू नये, यासाठी तिरंगा रॅलीनंतर १० दिवसांनी एकत्रित मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही माने यांनी सांगितले.
