मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पातील पात्रता निश्चितीत गैरप्रकार झाला असून बनावट कागदपत्रांच्या आधारे घरे लाटल्याची तक्रार धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडे (डीआरपी) करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीच्या अहवालातून अखेर पात्रता निश्चितीत गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शताब्दी नगरच्या परिशिष्ट-२ मध्ये पात्र ठरलेल्या ४० जणांनी बनावट कागदपत्रे सादर केल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे. ‘डीआरपी’ने आता त्यांच्या कागदपत्रांची पुनर्तपासणी सुरू केली असून दोषी आढळणाऱ्यांची पात्रता रद्द करून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. या प्रकरणामुळे प्रकल्पाच्या पात्रता निश्चिती प्रक्रियेवरच प्रश्न उपस्थित झाला आहे.
धारावी पुनर्विकासाअंतर्गत झोपडीधारकांची पात्रता निश्चिती करण्यासाठी डीआरपी आणि नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून बायोमेट्रिक सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणाच्या आधारे झोपडीधारकांची पात्रता निश्चिती करून परिशिष्ट-२ प्रसिद्ध केले जाणार आहे. परिशिष्ट-२ मधील पात्र रहिवाशांना योजनेतील घराचा लाभ मिळणार असल्याने ही प्रक्रिया या प्रकल्पात अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
दरम्यान, शताब्दी नगरच्या परिशिष्ट-२ मध्ये गैरप्रकार झाल्याची आणि बनावट कागदपत्रांद्वारे घरे लाटण्यात आल्याची लेखी तक्रार माजी आमदार बाबूराव माने यांनी डीआरपीकडे केली होती. त्यानंतर याप्रकरणी डीआरपीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशी समिती स्थापन केली. यासंबंधीचे सविस्तर वृत्त ‘लोकसत्ता’ने ५ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केले होते. या चौकशी समितीने आपला चौकशी अहवाल नुकताच डीआरपीकडे सादर केला. त्यानुसार शताब्दी नगर परिशिष्ट-२ मध्ये गैरप्रकार झाल्याचे सिद्ध झाल्याचे ‘डीआरपी’तील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले.
परिशिष्ट-२ मधील ४० जणांनी बनावट कागदपत्रे सादर केली असून त्याआधारे ते पात्र ठरले आहेत. या ४० जणांच्या कागदपत्रांची पुन्हा एकदा पडताळणी केली जात आहे. त्यात जे दोषी आढळतील त्यांची पात्रता रद्द होणार असून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले जातील, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.
शताब्दी नगरच्या पहिल्या परिशिष्ट-२ मध्ये ४० जण बोगस झोपडीधारक आढळणे ही बाब गंभीर आहे. या यादीत आणखी बोगस झोपडीधारक असावेत, असा संशय आहे. आता सर्वेक्षणाच्या अनुषंगाने टप्प्याटप्प्याने पात्रता याद्या जाहीर केल्या जात आहेत. त्यामुळे पुढील याद्यांमध्येही असे गैरप्रकार झाले असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे डीआरपी आणि कंत्राटदाराकडून सुरू असलेल्या सर्वेक्षणाची योग्य प्रकारे तपासणी झाली, तसेच दोषींविरोधात कडक कारवाई केली, गुन्हे दाखल झाले, तर हे प्रकार रोखणे शक्य होईल.
-बाबूराव माने, माजी आमदार
