मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत शाहूनगरमधील पालिका भाडेकरूंचे स्थलांतर आणि पुनर्वसन प्रक्रिया सुलभ करण्यासाठी दिवाळीनंतर दोन दिवसीय जनजागृती शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. शाहूनगर मैदानावर होणाऱ्या या शिबिरात पुनर्विकासाचे लाभ, संक्रमण निवासाचे पर्याय, भाडे सहाय्य योजना आणि स्थलांतरासाठी आवश्यक कागदपत्रांबाबत रहिवाशांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्प (डीआरपी), मुंबई महापालिका आणि अदानी नवभारत डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (एएनडीपीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शाहूनगरमधील पीएमजीपी वसाहतीतील म्हाडाच्या इमारतींमध्ये स्थलांतरासाठी प्रस्तावित असलेल्या ८७६ पालिका भाडेकरूंना या शिबिराचा लाभ मिळणार आहे. पुनर्वसनाचे हक्क, स्थलांतराच्या अटी आणि त्रिपक्षीय करारातील तरतुदी यांची माहिती देतानाच रहिवाशांच्या शंकांचे निरसन केले जाणार आहे, अशी माहिती डीआरपीचे सचिव विपिन पालीवाल यांनी दिली.
२७ ऑक्टोबर २०२६ च्या शासन अधिसूचनेनुसार, धारावीतील नूतनीकरण श्रेणीतील मालमत्तांसाठी किमान ५०० चौरस फुटांचे घर किंवा सध्याच्या क्षेत्रफळाच्या १.३५ पट क्षेत्रफळाचे घर, यापैकी जे अधिक असेल ते मिळण्याचा हक्क आहे. प्रकल्पाच्या आरंभापासून पाच वर्षांच्या आत जवळच्या परिसरात कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचे नियोजन आहे. पुनर्वसनानंतर इमारतींची १० वर्षे देखभाल केली जाणार आहे.
शाहूनगरमध्ये १६४ पालिका कर्मचारी निवासस्थाने आणि ८७६ पालिका भाडेकरू सदनिका आहेत. पालिकेच्या सर्व १६४ कर्मचाऱ्यांनी निवासस्थाने रिकामी केली असून, आठ इमारतींच्या प्रस्तावित पाडकामापूर्वी बॅरिकेडिंग सुरू करण्यात आले आहे. उर्वरित भाडेकरूंसाठी पीएमजीपी वसाहतीतील म्हाडाच्या इमारतींमध्ये ३५० ते ४०५ चौरस फुटांच्या संक्रमण सदनिका उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
संक्रमण निवासाऐवजी भाडे सहाय्याचा पर्याय निवडण्याचीही मुभा आहे. त्यानुसार, २७५ चौरस फुटांपर्यंतच्या घरांसाठी दरमहा २२ हजार रुपये, तर ३७५ चौरस फुटांच्या घरांसाठी ३० हजार रुपये भाडे सहाय्य मिळणार आहे. भाड्यात दरवर्षी पाच टक्के वाढ होईल. प्रत्येक कुटुंबाला १५ हजार रुपये एकरकमी स्थलांतर भत्ता दिला जाणार असून, करार आणि स्थलांतराची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी मिळणार आहे.
