मुंबई : धारावी पुनर्विकासाअंतर्गत धारावीकरांना ५०० चौ. फुटांचे घर द्यावे, सर्व धारावीकरांना, पात्र-अपात्र झोपडीधारकांना धारावीत घरे द्यावीत, यासह अन्य मागण्यांसाठी शनिवारी हजारो धारावीकर रस्त्यावर उतरले. त्यांनी ‘धारावी बचाव’ तिरंगा रॅली काढत आपल्या मागण्या पुन्हा एकदा राज्य सरकारसमोर ठेवल्या.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीचा पुनर्विकास धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या (डीआरपी) माध्यमातून केला जात आहे. तर या पुनर्विकासाचे कंत्राट अदानी समूहाला मिळाले. दरम्यान, धारावी पुनर्विकासाअंतर्गत झोपडीधारकांना ५०० चौ. फुटांचे घर द्यावे, अशी मागणी धारावीकरांची सुरुवातीपासून आहे. मात्र, ही मागणी काही मान्य होत नसल्याने धारावीकरांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

राज्य सरकारने धारावीकरांना ३५० चौ. फुटांचे घर देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हे क्षेत्र धारावीकरांना मान्य नाही. ५०० चौ. फुटांच्या घरांच्या मागणीवर धारावीकर ठाम आहेत. तर दुसरीकडे, या पुनर्विकासाअंतर्गत पहिल्यांदा अपात्र रहिवाशांचेही पुनर्वसन केले जाणार आहे. अपात्र रहिवाशांना धारावीबाहेर भाडेतत्त्वावरील गृहयोजनेअंतर्गत घरे दिली जाणार आहेत. मात्र, धारावीबाहेर अपात्र रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासही धारावीकरांचा विरोध आहे.

पात्रता निश्चित प्रक्रियेंतर्गत अधिकाधिक रहिवाशांना अपात्र ठरवून त्यांना धारावीबाहेर फेकण्याचा डाव असल्याचा आरोप धारावी बचाव आंदोलनाचा आहे. त्यामुळे पात्र असो वा अपात्र, सर्व रहिवाशांना धारावीतच घरे देण्याची मागणी धारावी बचाव आंदोलनाची, धारावीकरांची आहे. मात्र, त्यांच्या या मागण्या काही मान्य होताना दिसत नाहीत.

धारावीकरांना विश्वासात न घेता, त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत पुनर्विकास पुढे रेटला जात असल्याचा आरोप करत स्वातंत्र्यदिनी हजारो धारावीकर रस्त्यावर उतरले. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणा देत, तिरंगे झेंडे फडकवत ही रॅली धारावीतील रहिवासी आणि धारावी बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी काढली. संविधान चौक, मुकुंद नगर, सायन-बांद्रा लिंक रोड, धारावी मेन रोड, धारावी कोळीवाडा, धारावी पोस्ट ऑफिस, चामडा बाजार, बडी मशीद, इराणी हॉटेल, क्रॉस रोड, आकाशवाडी गेट या मार्गे या रॅलीचा समारोप शिवनारायण बावडीजवळील एनसीपी-शप कार्यालयावर झाला. यावेळी धारावीकरांनी जोरदार घोषणाबाजी केली.

धारावी बचाव तिरंगा यात्रेचे नेतृत्व धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक, माजी आमदार बाबुराव माने, ॲड. राजू कोरडे, नसीरूल हक, राष्ट्रवादी शपचे उल्लेश गाजाकोश, आपचे पॉल राफेल, आरपीआयचे अनिल कसारे आदींनी केले. रॅलीत श्यामलाल जैसवार, राहुल गायकवाड, समीर मगरू, अन्सार शेख, आयुब शेख, कलम भाई, शेकाप पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या साम्या कोरडे, माया जाधव, सुरेश सावंत आदींसह हजारो धारावीकर तिरंगे झेंडे घेऊन सहभागी झाले होते.