मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत धारावीतील अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी ५५० ते ६०० एकर जागेची आवश्यकता आहे. त्यानुसार धारावीबाहेरील विविध ठिकाणच्या जागेची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. मात्र अद्याप एक एकरही जागा ताब्यात आलेली नाही, अशी माहिती धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी दिली.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत पात्र रहिवाशांना ३५० चौरस फुटाचे घर देण्यात येणार आहे. दुसरीकडे पहिल्यांदाच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत अपात्र रहिवाशांनाही समावून घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. मात्र धारावीतील अपात्र रहिवाशांना धारावीबाहेर घरे देण्यात येणार आहेत. धारावी पुनर्विकासासाठी उपलब्ध असलेली धारावीतील जागा आणि लोकसंख्येची घनता लक्षात घेता अपात्रांना अन्यत्र घरे देणे क्रमप्राप्त झाल्याचे श्रीनिवास यांनी स्पष्ट केले. अपात्र रहिवाशांची संख्या एक लाख ते सव्वा लाखाच्या आसपास असण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली. एक ते सव्वा लाख रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासाठी ५५० ते ६०० एकर जागेची गरज आहे. त्यानुसार राज्य सरकारकडे जागेची मागणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप एक एकरही जागा ताब्यात आलेली नाही. धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या (डीआरपीपीएल) माध्यमातून मोठ्या संख्येने जागेची मागणी करण्यात आली असून त्या जागा डीआरपीपीएलला मिळाल्याबाबत सुरू असलेल्या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचेही श्रीनिवास यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे प्रकरण उच्च न्यायालयात; पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

सहा महिन्यांत कामास सुरुवात

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच प्रस्ताव सादर केला जाईल. सर्वेक्षणाचे कामही वेगात सुरू आहे. आतापर्यंत १० हजार रहिवाशांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून मार्च २०२५ पर्यंत हे काम १०० टक्के पूर्ण होईल. त्याचवेळी काम सुरू करण्यासाठी आवश्यक परवानग्या घेण्याचे कामही वेगात सुरू आहे. प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठीची संपूर्ण कार्यवाही येत्या सहा महिन्यांत पूर्ण करून नव्या वर्षात कामाला सुरुवात करण्यात येईल, असेही श्रीनिवास यांनी सांगितले.